जालना : काँग्रेसचे आमदार कैलास गोरट्याल यांच्यासह 11 आमदार नगरविकास खात्याच्या निधी वाटपावरुन नाराज आहेत (Rajesh Tope on unhappy congress MLA). याच मुद्द्यावर राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मित्रपक्ष कुठल्याही कारणाने नाराज असण्याचं कारण नाही. जर एखादी गोष्ट विश्वासात घेऊन केली नसल्याचं लक्षात आलं तर त्यावर तिन्ही पक्षांची कोअर कमेटी बसून निर्णय घेते, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.
राजेश टोपे म्हणाले, “मित्र पक्ष कुठल्याही कारणाने नाराज असण्याचं कारण नाही. जर विश्वासात घेऊन केली नाही अशी कोणतीही गोष्ट लक्षात आली तर त्याबाबत मित्र पक्षांची आमची कोअर कमिटी एकत्र बसून निर्णय घेत असते. जर निधी वाटपात थोडाफार भेदभाव झाला असल्याची कुणाची भूमिका असेल तर तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून त्यावर योग्य तो मार्ग काढतील. हा फार मोठा विषय नाही. ”
“आपल्याला राज्याचा खूप विकास करायचा आहे. सर्वांचा समन्वय साधूनच हा विकास करायचा आहे. त्यामुळे सुरुवातीचे काही अडथळे असतात, ते किरकोळ असतात. हे अडथळे तात्काळ दूर करण्यासाठी तिन्ही पक्षांचे नेतृत्व निश्चित लक्ष देऊन आहेत,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.
“शरद पवारांसोबत सिरम संस्थेला भेट देणार”
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लसीवरही भाष्य करत लवकरच सिरम संस्थेला भेट देणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “कोरोनाच्या लसीची प्राण्यावरील चाचणी पूर्ण झाली आहे. सध्या कोरोना लसीच्या वैद्यकीय चाचण्या सुरु झाल्या आहेत. हे काम वेगाने सुरु आहे. सिरम संस्था एक महत्त्वाची संस्था आहे. सिरम आयसीएमआर आणि युनायटेड किंग्डम यांच्या समन्वयातून काम सुरु आहे.”
“सिरम संस्था कोरोना लस निर्मितीच्या प्रक्रियेत खूप पुढे गेली आहे. मी स्वतः महाराष्ट्रात आणि देशात कोरोना लस निर्मिती व्हावी यासाठी सिरम संस्थेला शुभेच्छा दिल्या आहेत. मी स्वतः शरद पवार यांच्यासोबत सिरम संस्थेला भेट देणार आहे. त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार आहोत. तसेच त्यांच्या लस निर्माण करण्याच्या कामी त्यांना भेटून प्रोत्साहन देऊ,” असंही राजेश टोपे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील कोरोना लस निर्मितीबाबत उत्सुकता आहे, असंही राजेश टोपे यांनी यावेळी नमूद केलं.
संबंधित बातम्या :
Sushant Singh Case | महाराष्ट्र पोलिसांचं काम चांगलं, मला कोर्टाच्या निर्णयाचा आदर : राजेश टोपे
श्वसनासंबंधी 20 आजारांसाठी मोफत उपचार, शुल्क आकारल्यास हॉस्पिटलला पाचपट दंड, राजेश टोपेंच्या सूचना
N 95 असो किंवा कोणताही मास्क, ठरलेल्या किमतीतच विकावे लागतील, राजेश टोपेंनी ठणकावलं
Rajesh Tope on unhappy congress MLA