मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचीही चाहूल दिसायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुढील रणनीती आखण्यासाठी महत्त्वाच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. आज त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या दादर येथील घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे राज ठाकरे आणि राजू शेट्टी आगामी विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतही राजू शेट्टींच्या मतदारसंघात सभा घेत मोदी-शाह यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. तसेच याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला झाला, तरी होऊ द्या असे आवाहन केले होते.
राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत आपला एकही उमेदवार उभा केला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला. त्यासाठी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी विधानसभेसाठी बोलणी झाल्याचेही बोलले गेले. मात्र, यानंतरही लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या प्रचाराला हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, अशी टीका झाली. त्यामुळे आता राज ठाकरे देखील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आपली रणनीती ठरवत आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी राजू शेट्टी यांच्याशी काय चर्चा केली हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार श्री. राजू शेट्टी ह्यांनी राजसाहेबांची मुंबईतील कृष्णकुंज ह्या निवासस्थानी भेट घेतली. #शेतकऱ्यांचीमनसे? pic.twitter.com/f6R6q07uqF
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) May 28, 2019
देशपातळीवर विरोधकांना एकत्रित आणून भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची कोंडी करण्याची एकही संधी राज ठाकरेंनी सोडलेली नाही. त्यामुळे ही खेळीही महायुतीला अडचणीत आणण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांनीही सभा घेतल्या होत्या. दोन्ही बाजूनं याठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन करुन प्रचार करण्यात आला होता. या मतदारसंघात सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांचाही संघर्ष पाहायला मिळाला. या ठिकाणी आघाडी आणि युतीच्या सभा तर झाल्याच, सोबत राज ठाकरे यांनीही इचलकरंजीमध्ये मनसेची जाहीर सभा घेतली. यासभेमधून राज ठाकरे यांनी थेट मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. त्यामुळे याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळणार की काही वेगळी राजकीय समिकरणे तयार होणार हे लवकरच स्पष्ट होणार असल्याची शक्यता आहे.