औरंगाबाद : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty Aurangabad) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. निवडणूक लढवून चंद्रकांत पाटलांना त्यांची जागा दाखवणार असल्याचं राजू शेट्टींनी (Raju Shetty Aurangabad) म्हटलंय. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील जिथे निवडणूक लढतील, तिथे त्यांच्याविरोधात लढणार असल्याचंही राजू शेट्टींनी म्हटलंय.
स्वाभिमानी संघटना सध्या विविध मुद्द्यांवर आक्रमक झाली आहे. औरंगाबादमध्येही स्वाभिमानी संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला उपस्थिती लावत राजू शेट्टींनी सरकारवर जोरदार टीका केली. शिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी आव्हान दिलं असलं तरी चंद्रकांत पाटील निवडणूक लढण्याबाबत अजून कोणतीही माहिती नाही. कारण, चंद्रकांत पाटील सध्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. विधानपरिषदेचं सदस्यत्व असल्यामुळे ते निवडणूक लढतील की नाही याबाबत शंका आहे. तरीही पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढायला तयार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी यापूर्वी म्हटलं होतं.