बुलडाणा : जनतेच्या इच्छेविरुद्ध सत्तेला चिटकून राहिल्यास अशाच प्रतिक्रिया उमटत असतात, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांना लगावला. रामदास आठवले यांच्यावर एका कार्यक्रमात तरुणाकडून हल्ला करण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टींनी हे वक्तव्य केलं.
भाजप सरकारने केवळ दुष्काळ जाहीर केलाय. मात्र कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. शेतकर्यांना कोणताही मदतीचा हात हे भाजप सरकार देत नसून पीक विम्याचा पहिला हप्ता देण्याबाबत पीक विमा कंपन्यानी 17 डिसेंबरपर्यंत पुढाकार घेतला नाही तर राजू शेट्टींनी आंदोलनाचा इशारा दिलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ, मराठवाड्यात तालुका, जिल्हास्तरीय आणि जानेवारी महिन्यात नागपूर, औरंगाबादमध्ये मोर्चा काढणार, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
बुलडाणा येथे विदर्भ – मराठवाड्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यव्यापी बैठक आयोजित केली होती. बैठकीनंतर पत्रकारांशी खासदार राजू शेट्टी यांनी संवाद साधला. बुलडाणा बैठकीत स्वाभिमानी पक्षाने जिल्हानिहाय पक्षाचा आढावा घेतला असून स्वाभिमानी भाजप सोडून सर्व पक्षाचे जे महागठबंधन होऊ घातले आहे, त्यांच्यासोबत जाण्यास तयार आहे. फक्त शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव हे शेतकर्यांचे प्रश्न त्यांनी स्वीकार करावे हा आमच्या पक्षाचा अजेंडा राहणार आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.
महागठबंधन झाल्यास आम्ही महाराष्ट्रातील आठ जागा मागणार असून त्यामध्ये विदर्भातील बुलडाणा, वर्धा या दोन जागा प्रतिष्ठेच्या असतील. मराठवाड्यातील लातूर, धुळे, कोल्हापूर, सांगली, म्हाडा, हातकणंगले या जागेचा प्रामुख्याने समावेश असेल. महागठबंधन न झाल्यास आम्ही या आठ जागेवर आमचे लोकसभेचे उमेदवार उभे करणार आहोत. आमची शेतकऱ्यांच्या संदर्भातील भूमिका आम्ही सोडणार नसल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं. भाजपने विश्वासघात केलाय, त्यामुळे भाजप सोडून आम्ही इतर पक्षांशी महागठबंधन करण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील कंपन्यांनी दोन टक्के सीएसआर दुष्काळासाठी खर्च करावा आणि तसा जीआर सरकारने काढावा. स्वत:च्या कंपन्यानी स्थापन केलेल्या सेवेभावी संस्थेसाठी खर्च करू नये, असा आग्रह सरकारकडे धरणार असल्याचंही राजू शेट्टी यांनी सांगितलं.
भाजप सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून सरकार अडचणीत आलंय. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करण्याचा घाट घातला जातोय. तर धनगर समाजाला आरक्षण देऊ असं सरकरने आश्वासन दिलं होते म्हणून त्यांची मागणी रास्त आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले.
बुलढाण्यात आयोजित केलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीकडे राजकीय दृष्टीने लक्ष लागलं होतं. यामध्ये बुलडाणा, वर्धा लोकसभा आग्रही असल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने महागठबंधन कसे होईल हे येणारा काळच सांगणार आहे. या बैठकीला स्वाभिमानीचे प्रदेश अध्यक्ष रविकांत तुपकरसह मराठवाडा विदर्भातील पदाधिकारी, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.