नवी दिल्ली : वाईनला (Wine) किराणा दुकानात विकण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. या निर्णयामागे शेतकऱ्यांचे हीत असल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र वाईनला किराणा दुकानात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय योग्य आहे का? यावर समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून राज्य सरकारवर (State Government) जोरदार टीका केली जात आहे. आता शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वाईनचा विषय अनावश्यक चर्चेला आणून शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, वाईनला किराणा दुकानात विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र असे केल्याने वाईनचा खप वाढणार नाही किंवा कमी होणार नाही. किर्तनाने माणूस सुधारत नाही, ना तो लावणीने बिघडतो. त्यामुळे हा विषय आता संपला पाहिजे. काही लोक जाणीवपूर्वक हा विषय चर्चेमध्ये आणत आहे. मात्र या सर्वांमधून शेतकऱ्यांची नाहक बदनामी सुरू आहे, त्यामुळे हे सर्व वेळीच थांबायला पाहिजे.
दरम्यान यावेळी बोलताना शेट्टी यांनी पोलिसांच्या बदल्यावरून सध्याच्या सरकारवर जे आरोप होत आहेत त्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या लोकप्रतिनिधींच्या सल्ल्यावरूनच होत असतात. यापूर्वी देखील अनेकवेळा झाल्या आहेत. मात्र आता यामध्ये बदल झाला पाहिजे, पोलीस बदल्यांसाठी एक नियमावली निश्चित करण्यात यावी, तरच हा बदल्यांचा धंदा बंद होईल असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
यावेळी शेतकरी आंदोलनावरून देखील शेट्टी यांनी भाजपावर टीका केली. वर्षभरापेक्षाअधिक काळापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. अखेर तीन कृषी विधेयक मागे घेण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला. मात्र या सर्वांमध्ये 700 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
अमरावतीचा मनपा आयुक्त येडपट, रवी राणांच्या टीकेचा दर्जा घसरला, तर नवनीत राणा म्हणतात…