मुंबई : शिवसेना आणि भाजपच्या ज्या नेत्यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली, त्यांनी त्यांची उमेदवारी परत घ्या, नाहीतर कडक करावाई केली जाईल, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी काहीच दिवसांपूर्वी झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानंतर काही बंडखोर आमदारांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली (Rajul Patel Nomination). मात्र, अद्यापही काही नेते असेही आहेत जे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शिवसेना महिला विभागसंघटक आणि नगरसेविका राजुल पटेल (Rajul Patel Nomination).
वर्सोव्यात नगरसेविका राजुल पटेल अपक्ष उमेदवारी कायम ठेवणार आहेत. त्या त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याची भूमिका त्यांनी मांडली. ‘युतीत माझा कुठल्याही पक्षाला विरोध नाही, ना शिवसेनेला ना भाजपला, माझा विरोध हा व्यक्तीला आहे. म्हणजेच माझ्या मतदारसंघातील विद्यमान भाजप आमदार भारती लव्हेकर यांना माझा विरोध आहे’, असं राजुल पटेल यांनी स्पष्ट केलं.
तसेच, ‘युतीच्या जागावाटपात वर्सोवा ही जागा कुणालाही गेली असती, तर मला काही वाटले नसते. पण गेल्या पाच वर्षात भारती लव्हेकर यांनी मतदारसंघात काहीही काम केलेले नाही, दाखवला तो फक्त अटीट्यूड. दुसरा कुणी उमेदवार असता, तर मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला नसता. पण मी आता कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही’, असा पवित्राच जणू राजुल पटेल यांनी घेतला .
आज निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह मिळेल, त्यानंतर प्रचाराला सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, पक्षाकडून उमेदवारी मागे घेण्याबाबत संपर्क सुरु आहेत, पण पक्षात मी कुणाशीही याविषयावर बोलणं टाळत आहे, असं राजुल पटेल यांनी सांगितलं.
राजुल पटेल यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु
राजुल पटेल वर्सोवा मतदार संघात आमच्या नगरसेविका आहेत. त्यांचं काम चांगलं आहे. मात्र, दुर्दैवाने गेल्या पाच वर्षात तिथे भाजप आणि शिवसेनेचा संपर्क राहिला नाही. त्यामुळे तशी भावना निर्माण झाली. पण येत्या काही तासांत हे निर्णय होतील. आमचं राजुल पटेल यांच्याशी बोलणं सुरु आहे. बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतली नाही, तर त्यांच्यावर काय कारवाई करावी हा सर्वाधिकार पक्षप्रमुखांचा आहे, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते अॅड. अनिल परब यांनी दिली.
संबंधित बातम्या :
मुंबईत भाजप उमेदवार रमेश सिंह ठाकूर यांना भाषण करतानाच भोवळ
रश्मी बागल यांना दुसरा धक्का, भाजपच्या माजी आमदाराचा संजयमामा शिंदेंना पाठिंबा
अजित पवार म्हणाले शेती-उद्योग करा, जय पवारची विधानसभेच्या तोंडावर मोठी घोषणा