मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) तोंडावर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळतंय. राज्यसभेच्या 6 जागांसाठी आज मतदान पार पडलं. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. मात्र, अद्यापही मतमोजणी सुरु झालेली नाही. कारण, भाजपकडून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तीन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आलाय. तर महाविकास आघाडीनेही भाजपच्या मतांवर आक्षेप नोंदवला आहे. भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप नोंदवण्यात आलाय. त्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्रही लिहिण्यात आलं आहे. आता निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतरच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अशावेळी जितेंद्र आव्हाड रात्री विधान भवन परिसरात दाखल झाले आणि त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यावेळी मी मतदान प्रक्रियेत कुठलीही चूक केलेली नाही, असा दावा आव्हाड यांनी केलाय. त्याचबरोबर मी माझं मत आमच्या एजंटला दाखवलं नसतं तर सहा वर्षासाठी पक्षानं निलंबित केलं असतं, असंही आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्राला हे माहिती व्हावं की मी काय केलं हे सांगण्यासाठी आलोय. मी दुपारी साडे बाराच्या सुमारास विधान भवनात पोहोचलो. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो. तिथे मला जे सांगण्यात आलं होतं ते ऐकून मी वर गेलो, मतदान केलं. त्यानंतर माझ्या पक्षाचे जे एजंट होते त्या एजंटला मतदान दाखवायचं असतं आणि ही प्रक्रिया आहे. मी पाठमोरा उभा होतो, कागद अशा माझ्या छातीवर होता, जो दाखवायचा असतो तो, कॅमेरा माझ्या मागे होता. मी तिथे हसलो थोडासा, त्याला वेगळं कारण होतं. मी मतदानपत्रिका तिथेच बंद केली, खिशात टाकली, चालत बाहेर आलो, चालत मतदानच्या पेटीकडे गेलो, मतदान केलं आणि बाहेर निघून घेलो. त्यानंतर गेटवर आल्यावर माझ्यावर कुठलंही ऑब्जेक्शन नव्हतं. नंतर मला तुमच्याकडूनच कळलं की माझ्यावर आक्षेप नोंदवण्यात आलाय.
आव्हाड पुढे म्हणाले की, जी मतदानाची क्रिया आहे त्यात माझ्याकडून चूक झालेली आहे, ज्यातून माझं मत बाद व्हावं, असं माझ्याकडून काहीही झालेलं नाही. उगाच महाराष्ट्रासमोर हे जायला नको की, माझ्याकडून काही वेगळं झालं, आम्ही काही चूक केली. शेवटी महाराष्ट्राला कळत असेल हे काय घडतंय. यात कारण नसताना हा खेळ लांब घेऊन जायचा. हे जे चाललं आहे ते वेदनादायी आहे. आम्हीही 22 – 23 वर्षे झालं आमदार आहोत. कारण नसताना असले रडीचे डाव टाकायचे हे बरोबर नाही.
माझ्या मताप्रमाणे माझ्या हातून मतदानात कुठलीही चूक झालेली नाही. नियमाप्रमाणे माझं मतदान ज्या व्यक्तीला दाखवायचं असतं नियमाप्रमाणे. जर मी ते मतदान दाखवलं नाही तर मला माझी पार्टी 6 वर्षासाठी निलंबित करु शकते आणि माझं राजकीय आयुष्य बरबाद होऊ शकतं. मी माझी क्रिया केली, माझ्या माणसाला माझं मतदान दाखवलं. मी जी माहिती घेतली, अगदी समोरच्या गोटातूनही घेतली ते म्हणाले तुमचं व्हिडीओत काही दिसत नाही, असं आव्हाडांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना दुपारनंतर रात्री पुन्हा एकदा स्पष्टीकरण काय द्यावं लागत आहे? त्यांनी मतदानावेळी आपण काहीही चुकीचं केलं नसल्याचा दावा केला असला तरी त्यांच्या कृतीमुळे महाविकास आघाडीत काही बिघाडी झाली का? त्यामुळेच आव्हाड पुन्हा एकदा माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण देत आहेत का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.