मुंबई : राज्यात राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) आज मतदान पार पडलं. मात्र, संध्याकाळी पाच वाजता सुरु होणारी मतमोजणी अद्याप सुरु झालेली नाही. महाराष्ट्रासह हरियाणातही मतमोजणी सुरु होण्यास उशीर होत आहे. महाराष्ट्रात भाजप आणि महाविकास आघाडीकडून काही मतांवर आक्षेप घेण्यात आलाय. इतकंच नाही तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission) तक्रारही दाखल केली आहे. भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे संतोष कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आलाय. तर महाविकास आघाडीकडून सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि रवी राणा यांचे मत बाद करण्याची मागणी करण्यात आलीय. महाविकास आघाडीकडून सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांच्या मतांवर आक्षेप का घेण्यात आला? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
भाजपनं ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतांवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. त्याच प्रमाणे महाविकास आघाडीनेही सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना दाखवल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. मात्र, भाजपकडून हा आरोप फेटाळण्यात आलाय. चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, बावनकुळे म्हणाले की, कुठल्याही मतपत्रिकेला मी हात लावला नाही. मला जो अधिकार दिला होता कुणाला मत करण्याचा आणि तो पाहण्याचा त्या अधिकाराचा मी फक्त वापर केला. कुठल्याही मतपत्रिकेला हात लावला नाही. उलट त्यांनी जे काही मतपत्रिका हातात घेतल्या होत्या त्याला आम्ही आक्षेप घेतला. त्याला काऊंटर करण्यासाठी ते हा आरोप करत आहेत. या आक्षेपात काही तथ्य नाही, असा दावा बावनकुळे यांनी केलाय.
तर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी मतदान केल्यानंतर हनुमान चालिसा दाखवल्याचा आक्षेप नोंदवण्यात आलाय. रवी राणा यांचं मत बाद करण्यात यावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. रवी राणा यांनी हनुमान चालिसा दाखवुन हिंदू मतं प्रभावित करण्याचा प्रयत्न केला असा आक्षेप शिवसेनेकडून नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, रवी राणा यांनी हनुमान चालिसा दाखवणं गुन्हा नाही. शिवसेना हनुमान चालिसाला इतका विरोध का करत आहे? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
तर खासदार नवनीत राणा यांनीही शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. सकाळापासून मी हि सगळी प्रक्रिया पाहतेय. महाविकास आघाडीला नेमकी कोणती चिंता सतावत आहे कळत नाही. ज्या प्रकारे शिवसेना प्रत्येक गोष्टीवर, हनुमान चालिसाचं पुस्तक दाखवलं तरी तरी त्यांना अडचण आहे. आम्ही हनुमान चालिसा खिशात घेऊन फिरतो त्यावर कुणी आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. चांगल्या कामासाठी एखादी व्यक्ती देवाची प्रार्थना करत असेल आणि ते फेसबुकवर टाकत असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. मला वाटतं शिवसेना ज्या प्रकारे घाबरली आहे ते संपूर्ण राज्याला पाहायला मिळत आहे, असा टोला नवनीत राणा यांनी लगावलाय.