कोल्हापूर : राज्यात राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election) रणधुमाळी सुरु आहे. राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अधिक रंगत पाहायला मिळतेय. सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं कोल्हापूरच्या संजय पवार (Sanjay Pawar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर भाजपकडून कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांना (Dhananjay Mahadik) उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे कोल्हापूरच्या आखाड्यातील कोणता मल्ल बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, धनंजय महाडिक आणि संजय पवार या दोन्ही उमेदवाराच्या कुटुंबियांनी विजयाचा दावा केलाय.
संजय पवार यांच्या पत्नी आणि मुलीने विजयाचा दावा केलाय. ‘आम्ही निकालाची वाट पाहतोय. कधी निकाल लागेल आणि आम्ही उत्सव साजरा करु असं आम्हाला वाटत आहे. संजय पवार यांचा विजय नक्की होईल असं आम्हाला वाटतं’, अशी प्रतिक्रिया संजय पवार यांच्या पत्तीने दिलीय. तर ‘आम्ही पप्पांचा संघर्ष मागच्या 30 वर्षापासून पाहत आलोय. आम्हाला आनंद आहे, धाकधुकही आहे. पण आम्हाला विश्वास वाटतो की संजय पवार खासदार म्हणून निवडून येतील. त्यांच्या कष्टाचं फळ मिळू दे अशी प्रार्थना देवाकडे करतो आहोत. निकालाची आतुरतेने वाट पाहतोय’, असं संजय पवार यांच्या मुलीने म्हटलंय.
तर दुसरीकडे भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. पक्षीय पातळीवर केलेले प्रयत्न आणि वैयक्तिक गाठीभेठींमुळे विजयाची अपेक्षा आहे, असं शौमिका महाडिक म्हणाल्या. तसंच धनंजय महाडिक आणि शरद पवार यांच्या वैयक्तिक संबंधाचा फायदा होईल का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सूचक वक्तव्य केलंय. तसा काही फायदा झाला तर आनंदच आहे, असं शौमिका महाडिक म्हणाल्या.