नागपूर : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) सहाव्या जागेवरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. अशावेळी काँग्रेसनं उत्तर प्रदेशातील नेत्याला महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे. अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांनीही ट्विट करुन जाहीर नाराजी व्यक्त केलीय. अशावेळी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. काँग्रेसकडे एकच जागा होती. त्यामुळे कुणालाही उमेदवारी मिळाली असती तरी सगळ्यांचं समाधान झालं नसतं. केंद्रीय नेतृत्वाने त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार घोषणा केल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. तसंच मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांना तिकीट दिलं असेल तर ते महाराष्ट्रातून द्यावं आणि ज्यांचं नाव महाराष्ट्रातून आलं आहे त्यांना इतर राज्यातून देण्यात यावं, अशी मागणीही चव्हाण यांनी हायकमांडकडे केलीय.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मी माझ्या वतीनं श्रेष्टींना कळवलं आहे की मुकुल वासनिक यांना तिकीट दिल्याबद्दल अभिनंदन. वासनिक यांना तिकीट दिलं असेल तर ते महाराष्ट्रातून द्यावं आणि ज्यांचं नाव महाराष्ट्रातून आलं आहे त्यांना इतर राज्यातून देण्यात यावं. असं केलं तर मुकुल वासनिक यांचा विदर्भाशी असलेला संपर्क तुटणार नाही. ही विनंती मी वरिष्ठांना कळवली आहे, इतरांनीही कळवली असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. राजस्थान आणि छत्तीसगडमझ्ये निवडणुका आहेत. मात्र, त्या ठिकाणी एकही उमेदवार दिला नाही, याबाबत नाराजी कळवली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्यातील आमदारांना होणाऱ्या निधी वाटपावरुनही चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केलीय. राज्यात काँग्रेस आमदारांना निधी असमतोल पद्धतीने वाटप केला जातो अशी खंत आहे. ज्या पद्धतीने निधी वाटप व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. ज्या विभागात निधीचं असमतोल वाटप झालं त्याठिकाणी काँग्रेसनं आपलं आग्रही मत मांडलं आहे. त्याचप्रमाणे एखाद्या काँग्रेस नेत्याकडून निधीत पक्षपात झाला असेल तर ते शोधलं पाहिजे आणि सुधारणा केली पाहिजे. कारण हे तीन पक्षाचं सरकार आहे. ते चालवायचं असेल तर समानता असावी, अशी अपेक्षाही चव्हाण यांनी व्यक्त केलीय.
63 वर्षीय मुकुल वासनिक हे महाराष्ट्राचे रहिवासी आहे. ते चार वेळा लोकसभा खासदार राहिले असून त्यातील तीन टर्म ते केंद्रीय मंत्री होते. तर सध्या हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आहेत. त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर मुकुल वासनिक यांचं नाव काँग्रेसचे भावी अध्यक्ष म्हणून सोशल मीडियावर चर्चेत आलं होतं.