मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपने महाविकास आघाडीला पर्यायानं शिवसेनेला मोठा झटका दिलाय. सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे तीन तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, सहाव्या जागेसाठी झालेल्या लढतीत शिवसेना उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनितीपुढे शिवसेनेचा निभाव लागला नाही. भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी संजय पवारांचा पराभव केला. त्यानंतर मात्र महाविकास आघाडीत मोठं नाराजीनाट्य पाहायला मिळालं. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संजय पवारांच्या पराभवाचं खापर अपक्ष आमदारांवर फोडलं. महत्वाची बाब म्हणजे राऊत यांनी त्या सहा आमदारांची नावंही जाहीर केली. त्यात आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळे नाराज झालेल्या भुयार यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली. त्यावेळी पवारांनी भुयार यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तसंच राऊतांच्या वक्तव्यानंतर पक्षाकडून खुलासा करु असं आश्वासनही पवार यांनी भुयार यांना दिलंय.
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र भुयार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी भुयार म्हणाले की, पवारसाहेब ट्रायडंटच्या बैठकीला होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते. त्यावेळी पवारसाहेबांच्या समोरच मी माझ्या ज्या वेदना होत्या त्या मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवल्या. मोठ्या नेत्यांबाबत लहान कार्यकर्ता नाराजी व्यक्त करत नाही. पण मी माझ्या वेदना, जनतेच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा बोलून दाखवल्या. मग बाकी लोकांना असं वाटलं की देवेंद्र भुयार मुख्यमंत्र्यांच्या, शिवसेनेच्या किंवा शिवसेना उमेदवाराच्या विरोधात आहे. तो भास मनात ठेवून राज्यसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला त्यानंतर त्याचं खापर अपक्ष आमदारांवर पर्यायानं माझ्यावर फोडलं गेलं. मी हा सगळा घटनाक्रम पवारसाहेबांना सांगितला. साहेबांनी स्वत: ते मान्य केलं. पवारसाहेबांनी संजय राऊत यांचं स्टेटमेंट ऐकलं. ते म्हणाले की संजय राऊत गैरसमजातून बोलले आहेत. याबाबत मी स्वत: संजय राऊत यांच्याशी बोलणार आहे, त्यांचा गैरसमज दूर करणार आहे. तसंच याबाबत त्यांना खुलासाही करायला लावणार आहे. पवारसाहेबांनी हे देखील सांगितलं की पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, पक्षाचे प्रमुख नेते किंवा प्रतोद यांनाही याबाबत खुलासा करायला लावणार आहे. लगेच थोड्यावेळात त्यांचा खुलासा येणार आहे, असं शरद पवार यांनी सांगितल्याचं देवेंद्र भुयार म्हणाले.
भुयार पुढे म्हणाले की काल मी मतदारसंघात गेलो आणि आज लगेच परत आलो. कारण एकप्रकारे हा मला जनतेच्या नजरेत, नेत्यांच्या नजरेत बदनाम करण्याचा प्रयत्न चालला आहे. रात्री मला झोप आली नाही. मी पवारसाहेबांना फोन करुन त्यांची वेळ मागितली. त्यानुसार आज त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मी भेटण्यासाठी जाणार आहे. कारण अडीच वर्षात भेट होऊ शकली नाही. मी त्यांना निधी देऊ नका पण वेळ द्या अशी मागणी केली होती. त्यांनीही शब्द दिला होता. त्यानुसार त्यांची भेट घेणार आहे. मी संजय राऊत साहेब यांचीही भेट घेणार असल्याचं भुयार यांनी सांगितलं.