Rajya Sabha Election : महाविकास आघाडीचं पुन्हा शक्तीप्रदर्शन! हॉटेल ट्रायडंटमध्ये थोड्याच वेळात बैठक; ठाकरे, पवार, खरगेंचं मार्गदर्शन

| Updated on: Jun 07, 2022 | 6:42 PM

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करताना दिसून येत आहे. हॉटेल ट्रायडंटमध्ये आज महाविकास आघाडी आणि त्यांच्या समर्थक आमदारांची महत्वाची बैठक होणार आहे.

Rajya Sabha Election : महाविकास आघाडीचं पुन्हा शक्तीप्रदर्शन! हॉटेल ट्रायडंटमध्ये थोड्याच वेळात बैठक; ठाकरे, पवार, खरगेंचं मार्गदर्शन
महाविकास आघाडी स्थापना (फाईल फोटो)
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) आणि त्यापाठोपाठ आलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा जोरदार राजकीय वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. अशावेळी घोडेबाजाराची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं (Congress, NCP) आपले आमदार सुरक्षित ठिकाणी नेले आहेत. शिवसेनेचे आमदार हॉटेल ट्रायडंटमध्ये तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार हॉटेल वेस्टिनमध्ये मुक्कामी असणार आहेत. भाजपही आपल्या आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करताना दिसून येत आहे. हॉटेल ट्रायडंटमध्ये आज महाविकास आघाडी आणि त्यांच्या समर्थक आमदारांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे मार्गदर्शन करणार आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळीही असंच काहीसं चित्र राज्यात पाहायला मिळालं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी एकत्र येत भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं. पवारांनी मोठी खेळी करत महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यावेळीही पवार, ठाकरे आणि थोरातांच्या नेतृत्वात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं. राज्याच्या राजकारणातील ते चित्र आजही अनेकांना आठवत असेल. महाविकास आघाडीला अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर आज पुन्हा एकदा तेच चित्र हॉटेल ट्रायडंटमध्ये पाहायला मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

6 जागांसाठी 7 उमेदवार, प्रतिष्ठा पणाला

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेनं आपला दुसरा उमेदवार दिला. शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर भाजपनेही धनंजय महाडिक यांच्या रुपात आपला तिसरा उमेदवार देत महाविकास आघाडीसमोर आणि पर्यायानं शिवसेनेसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. अशावेळी नाराज आमदार, छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न महाविकास आघाडी आणि भाजपकडूनही केले जात आहेत. त्यासाठी फोनाफोनी आणि गुप्त भेटीगाठी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले आहेत. तर भाजपही आपल्या आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवणार आहे.

आम्ही घाबरलेलो नाही – संजय राऊत

दरम्यान, आज संध्याकाळी महाविकास आघाडीचे नेते आणि सर्व आमदारांची बैठक होणार आहे. त्याबाबत विचारलं असता आम्ही घाबरलेलो नाही. आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक होणार आहे. या निवडणुका फार तांत्रिक असतात. त्यामुळे मतदानाची माहिती आमदारांना दिली जाईल असं राऊत यांनी सांगितलं.