मुंबई : राज्यसभा निवडणुकीचा (Rajya Sabha Election) तब्बल 9 तासांचा सस्पेन्स आता संपला आहे. निवडणुकीचा निकाल हातील आलाय. त्यात भाजपचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारल्याचं स्पष्ट झालंय. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात होते. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तर भाजपकडूनही कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांना (Dhananjay Mahadik) उमेदवारी देण्यात आली होती. कोल्हापूरच्या आखाड्यात कोणता मल्ल बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात भाजपनं यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आणि पर्यायानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.
धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर भाजप नेत्यांनी विधान भवनातच जल्लोष केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, हर्षवर्धन पाटील, रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावे विजयाच्या घोषणा दिल्या. त्यावेळी हा पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या रणनितीचा, त्यांच्या डोक्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलीय.
राज्यसभेची सहावी जागा जिंकल्यानंतर, त्यातही कोल्हापूरचे धनंजय महाडिक विजयी झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला. संपूर्ण महाविकास आघाडीवर एकटे देवेंद्र फडणवीस भारी पडले, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यावेळी चंद्रकांत पाटील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
धनंजय महाडिक, भाजप – 41
संजय पवार, शिवसेना – 33
धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातून राजर्षी शाहू महाविद्यालयातून बीकॉमपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. ते उत्कृष्ट स्पोर्ट्समन आहेत. कुस्ती आणि बॉक्सिंग यात ते राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेले आहेत. छात्र नेता म्हमून त्यांनी कॉलेज आणि विद्यापीठ निवडणुकांत निर्णायक भूमिका बजावल्या आहेत. त्यांचे वडील भीमराव महाडिक यांच्या मृत्यूनंतर ते व्यापारात आले आणि त्यांच्या वडिलांचा उद्योग समूह त्यांनी सांभाळण्यास सुरुवात केली. 15 हून अधिक वर्षे ते सामाजिक कार्यात आहेत.
धनंजय महाडिक यांनी 2004, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. 2004 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती पण राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिकांकडून त्यांचा पराभव झाला होता. 2009 साली त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र त्यावेळी महाडिकांना वगळून छत्रपती संभाजीराजेंना राष्ट्रवादीने तिकिट दिले होते. धनंजय महाडिकांना थांबण्यास सांगण्यात आले. तर सदाशीव मंडकि यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. 2009 साली महाडिक यांनी दक्षिण कोल्हपूर विधानसभेतून निवडणूक लढवली होती. २०१४ साली त्यांना राष्ट्रवादीचे खासदारकीचे तिकिट देण्यात आले. त्यावेळी ते पहिल्यांदा खासदार झाले. 2019 साली ही त्यांनी निवडणूक लढवली पण शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला.
कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्र्वादीचे हसन मुश्रीफ आणि राजेंद्र यट्रावकर हे मंत्री आहेत. त्यामुळे कोल्हापुरात भाजपाची ताकद वाढवण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. 2019 साली झालेल्या विधानसभेत कोल्हापुरात भाजपाला यश मिळालं नव्हतं. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनाही कोथरुड, पुण्यातून उमेदवारी देण्यात आली होती. कोल्हापूरचे राजकारण हे सहकारावर अवलंबून आहे. त्यामुळे महाडिकांच्या रुपाने भाजपाला तिथे स्थानिक नेतृत्व देण्याचा प्रयत्न आहे.