मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं आपला दुसरा उमेदवार जाहीर केलाय. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी शिवसेना प्रवेशाचा प्रस्ताव डावलल्यानंतर शिवसेनेनं कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तशी माहिती दिली आहे, मात्र अधिकृत घोषणा होणार असल्याचंही राऊत म्हणाले. शिवसेनेकडून संजय पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता मराठा (Maratha) समन्वयक आणि छावा संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. शिवसेनेनं संभाजीराजे छत्रपतींसोबत विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच पवार साहेबांना आपल्यावर लागलेला विश्वासघातकीचा शिक्का पुसण्याची ही संधी असल्याचंही मराठा समन्वयक म्हणालेत.
शिवसेनेकडून संजय पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती मुंबईत ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. तसंच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. अशावेळी छावा संघटनेचे धनंजय जाधव, अंकुश कदम, विनोद साबळे, महेस डोंगरे, गंगाधर काळकुटे याच्यासह मराठा समाजातील तरुण ट्रायडंट हॉटेलसमोर पोहोचले. त्यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केलाय. ‘संभाजीराजेंनी दिल्ली मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेठी घेतल्या होत्या. त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सांगितलं होतं की ते ही जागा कशा पद्धतीने लढत आहेत, यामध्ये मला तुमचं सहकार्य हवं. शरद पवार यांनी नांदेडमध्ये जाहीररित्या सांगितलं होतं की आम्ही आमची शिल्लक राहिलेली मतं संभाजीराजेंना देऊ. त्यांनी त्यांची भूमिका पार पाडल्यानंतर चेंडू शिवसेनेच्या कोर्टात गेला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदय सामंत, अनिल देसाई, अनिल परब असतील. त्याचबरोबर शिवसेनेचे वाचाळवीर संजय राऊत असतील. या सगळ्यांना माहिती होतं. याबाबत चर्चा खूप पुढे गेली होती. एक ड्राफ्ट ठरला होता. संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यात अडचण असेल तर त्यांना शिवसेना पुरस्कृत कसं करता येईल. या पद्धतीचा ड्राफ्ट एका मंत्र्याच्या बंगल्यात तयार झाला होता. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाची आणि संभाजीराजेंची ट्रायडंट हॉटेलमध्ये चर्चा झाली होती. तिथे संभाजीराजेंना पुरस्कृत करण्याबाबत एकवाक्यता झाली. आजही वेळ गेलेली नाही. सन्माननीय पवार साहेबांवर लागलेला विश्वासघातकीचा डाग पुसण्याची ही संधी आहे. पवार साहेब, आणि उद्धव ठाकरेंनी छत्रपतींना दिलेला शब्द फिरवता कामा नये’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
तसंच उद्धव ठाकरे आणि पवारसाहेबांना आवाहन आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत ओपन टेबल मिटिंग घ्यावी. त्यांनी दिलेली आश्वासनं जर खोटी असतील तर आम्ही इथं थांबू. परंतु तुम्ही जी गद्दारी केली आहे हे पुराव्यानिशी, ड्राफ्ट घेऊन, फोटोग्राफ्स घेऊन तुमचा चेहरा उघड करणार, असा इशाराही मराठा समन्वयकांनी यावेळी दिलाय.