मुंबईः शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्यासाठी मतांचा कोटा वाढवल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड संतापले असल्याचं वृत्त शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीनं नाकारण्यात आलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी बोलताना यासंबंधीचं वक्तव्य केलं. मुख्यमंत्री नाराज वगैरे नाहीत. मी आत्ताच त्यांच्याशी फोनवर बोललोय. कोटा वाढवल्याच्या बातम्या विरोध पक्षांकडून पेरल्या जात आहेत. मात्र त्यात फार तथ्य नाही. ठरल्याप्रमाणे मतांचं गणित होणार आहे. त्यात फार बदल होणार नाहीत. महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, अशी स्पष्टोक्ती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 169 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक-एक असे चारही उमेदवार निवडून येणार आहेत. आजच्या मतदानात हे आकडे दिसतील. राज्यसभेत मोठी चुरस पहायला मिळणार अशा प्रकारची हवा विरोधकांनी निर्माण केली आहे. मात्र आमचं सरकार मजबूत आहे आणि सर्व सदस्यांचं आम्हाला समर्थन आहे. इथे कुणीही नाराज नाही. अत्यंत खेळीमेळीत ही निवडणूक लढवली जातेय’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
राज्यसभेसाठी येत्या काही वेळात मतदान होत असतानाच महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. शरद पवार यांनी ऐनवेळी 42 ऐवजी 44 असा मतांचा कोटा वाढवल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचा फटका शिवसेना उमेदवाराला बसेल आणि शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे शिवसेनेत नाराजी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड संतापले असल्याचं बोललं जात आहे.
ज्यांनी बाभळीची झाडं लावली त्यांना काटेच मिळणार, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं. मविआचे चारही उमेदवार बहुमतानी निवडून येतील. तसेच एमआयएमकडे आम्ही मत मागायला गेलो नव्हतो. त्यांना मविआला मतं द्यायची असतील तर त्यात गैर काही नाही. भाजपला याचा दगा फटका बसणार असून आजपासून भाजपची उलटी गिनती सुरु होणार असल्याचंही नाना पटोले म्हणाले.