मुंबईः राज्यसभा आणि विधान परिषद (Vidhan Parishad Election) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून यातच एक मोठी बातमी हाती आली आहे. भाजपकडून विधान परिषद उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. यात प्रवीण दरेकरांसह (Pravin Darekar) प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे . ही नावं जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.. लवकरच याबाबत अधिकृत घोषणाही केली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सदाभाऊ खोत आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडेना उमेदवारी दिली जाणार नसल्याची माहिती समोर येतेय. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक पार पडणार आहे. याकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 9 जून ही आहे. भाजपाच्या चार जागांसाठी इच्छुकांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंग, पंकजा मुंडे, राम शिंदे, सदाभाऊ खोत, श्रीकांत भारतीय आदींची नावं दिल्लीत पाठवण्यात आली होती. त्यापैकी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे आणि श्रीकांत या पाच उमेदावारांची नावं निश्चित झाल्याची माहिती हाती आली आहे. ओबीसी नेतृत्वासाठी पंकजा मुंडे किंवा राम शिंदे यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता होती. या दोघांच्या शर्यतीत पंकजा मुंडे यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. लवकरच भाजप तर्फे यासंबंधीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
– 09 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार
– 10 जूनला निवडणूक अर्जांची छाननी केली जाईलय
– 13 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.
– 20 जून रोजी मतदान पार पडेल.
– सकाळी 9 ते दुपारी 4वाजेपर्यंत मतदान होईल.
– 20जून रोजी सायंकाळी पाच नंतर मतमोजणी होईल.
– 20 जून रोजीच विधान परिषदेचं चित्र स्पष्ट होईल.