Rajya Sabha Election Result 2022: ठाकरे सरकारचं अस्तित्व धोक्यात? ह्या 5 कारणांवर ठाकरे सरकारला उत्तर शोधावीच लागतील

| Updated on: Jun 11, 2022 | 10:29 AM

अखेरीस पहिल्या आणि दुसऱ्या पसंती ठरवताना फडणवीसांचे डावपेच सुरक्षित ठरले आणि शिवसेनेवर पराभवाची नामुश्की ओढवली. ठाकरे सरकारनं अनेक बारीक सारीक गोष्टींचं आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे कारण काहीच दिवसात विधानपरिषदेचा आखाडा रंगणार आहे.

Rajya Sabha Election Result 2022: ठाकरे सरकारचं अस्तित्व धोक्यात? ह्या 5 कारणांवर ठाकरे सरकारला उत्तर शोधावीच लागतील
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) भक्कम आहे, पुढे आणखी अडीच वर्ष या सरकारला धक्काही लागणार नाही, असं म्हणणाऱ्या ठाकरे (Thackeary Government) सरकारला आता थोडं आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी रात्री लागला. यात शिवसेनेचे संजय राऊत अत्यंत काठावर पास झाले तर सहाव्या जागेसाठी शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण अखेरच्या क्षणाला भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी झाले आणि शिवसेनेला हार पत्करावी लागली. महाविकास आघाडीचं बळ असतानाही या पराभवानंतर शिवसेनेला धक्का बसलाय. निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीतील आमदार आणि अपक्षांच्या बैठकांमध्ये सर्वच सदस्य हजर होते, पण त्यांच्यातील धुसपूस ठाकरे सरकारला टिपता आली नाही. किंवा ज्यांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली, त्यांचं समाधान करण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. तीन पक्षांच्या आघाडीतील बिघाडीचे मुद्दे तर वारंवार समोर उफाळून येताना दिसतायत. त्यावर अत्यंत क्लीष्ट समजल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत फडणवीसांनी टाकलेले डावपेचही भल्या भल्या अनुभवींना चक्रावून टाकणारे आहेत. सद्यस्थितीत तरी राज्यसभा निवडणूक मतदानाच्या दीर्घ नाट्यावर पडदा न टाकता यातील प्रत्येक मुद्दा सुटा सुटा करून त्यावर विचार करणं शिवसेनेला भाग आहे. काय आहेत ती पाच कारणं?

1- अपक्षांची नाराजी

राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानाचा कोटा पूर्ण होण्यासाठी शिवसेनेनं मोठं शक्तीप्रदर्शन केलं. मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंडमध्ये सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली. महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी ज्या अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला होता, त्यातील बाराही अपक्ष आमदार बैठकीला उपस्थित होते. अपक्ष आमदारांमध्ये गीता जैन, देवेंद्र भुयार, मंजुळा गावित, आशिष जयस्वाल, किशोर जोरगेवार, नरेंद्र भोंडकर, श्यामसुंदर शिंदे, संजय मामा शिंदे, चंद्रकांत पाटील, विनोद निकोले, विनोद अग्रवाल, राजकुमार पटेल यांचा समावेश होता. 50 मिनिटं चाललेल्या या बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी मार्गदर्शन केलं. आमदारांकडून आश्वासन घेतलं. याआधारे मविआच्या चारही जागांवर आपलेच उमेदवार निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेला वाटला. पण ऐनवेळी 10 ते 12 अपक्षांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचं दिसून आलं. आमदारांच्या मनातील मत शिवसेनेला टिपता आला नाही की ऐनवेळी भाजपनं खेळी करून हे मत खेचून घेतलं, याचा शोध शिवसेनेला घ्यावा लागेल.

2- स्वकिय आमदारांची नाराजी

अपक्ष आमदारांनी दिलेल्या फटक्याप्रमाणेच महाविकास आघाडीतील आमदारांची नाराजीही ठाकरे सरकारला भोवली. दिलीप मोहीते, अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे आमदारा शेवटपर्यंत नाराज होते. दिलीप मोहिते पाटलांनी तर आपली नाराजी उघडच केली होती. आमच्याकडे सरकारचं दुर्लक्ष झालं, अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली. आमच्या प्रकल्पांकडे, कामांकडे सरकारचं लक्ष नाही असं म्हणणाऱ्या मोहितेंना राष्ट्रवादीकडून आश्वासनही मिळालं. त्यानंतर मतदान करतो, मात्र कामं करा, अशी प्रतिक्रिया दिली होती. अण्णा बनसोडे यांनीही मतदान करण्याचीच इच्छा नसल्याचं दर्शवलं होतं. खुद्द तानाजी जाखव यांच्यासारख्या शिवसेनेतील आमदारांचीही धुसपूस ठाकरे सरकारला टिपता आली नाही. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, तेव्हापासून नाराज असलेल्या तानाजी सावंतांची चर्चा राज्यभर होती. शिवसेनेच्या अनेक बैठकांना ते गैरहजर होते. राज्यसभा निवडणुकीसाठी एक एक मत अत्यंत महत्त्वाचं असताना ठाकरे सरकारनं ही बाजू वाऱ्यावरच सोडली.

हे सुद्धा वाचा

3- छोट्या पक्षांची मॅनेजमेंट

बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांनी आपलं मत कुणाकडे जाणार, यावरून अखेरपर्यंत सस्पेन्स कायम ठेवला. हितेंद्र ठाकुरांच्या नेतृत्वात मुंबईतील या तीनही आमदारांनी दुपारपर्यंत मतदान केलं नव्हतं. त्यामुळे भाजप आणि मविआ या दोघांनाही त्यांनी शेवटपर्यंत ऑफरचा चान्स दिला होता. पण शिवसेना इथही कमी पडली आणि ही मत भाजपने आपल्याकडे वळती करून घेतली. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही अखेरच्या वेळी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानावरून आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांची नाराजी दूर करण्यात शिवसेनेला यश आलं असलं तरीही आगामी काळात ते दगाफटका करू शकतात, याचीही खबरदारी शिवसेनेला घ्यावी लागेल.

4- आघाडीत समन्वयाचा अभाव

तीन पक्षांचं सरकार म्हटलं की मतभेद येणारच. महाविकास आघाडीतील मतभेदही अनेकदा उफाळून येताना दिसत आहेत. तरीही ऐनवेळी सगळेच पक्ष आमचं ऑलवेल आहे, असं सांगतात आणि चर्चांना पूर्णविराम मिळतो. पण प्रत्यक्षात कोणता पक्ष कोणते डावपेच खेळेल, हे सांगता येत नाही. त्यात पुन्हा तीन पक्षांमध्ये राष्ट्रवादीचा समावेश! राज्यसभा निवडणुकीच्या आदल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेसनं आपापला उमेदवार विजयी होईल, अशा सगळ्या खेळ्या केल्या. मतांचा कोटाही वाढवला. शिवसेना मात्र असे चपखल डाव टाकण्यात शेवटपर्यंत झगडताना दिसली.

5- फडणवीसांचा करिश्मा-

देशात नरेंद्र आणि महाराष्ट्राक देवेंद्र यांचा करिश्मा नाकारणारी एकही व्यक्ती नाही. दोन महिन्यांपूर्वी पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकांमध्येही फडणवीसांचा करिश्मा दिसून आला. आता राज्यसभेसारख्या अत्यंत क्लीष्ट निवडणुकीत फडणवीसांचा अभ्यासही तितकात चोख दिसून आला. या निवडणुकीतील खाचखळगे, बारकावे फडणवीसांनी हेरले आणि त्यानुसार भाजप नेत्यांनी डावपेच टाकले. मतदानानंतर मतमोजणीसाठीची शिवसेना आणि आघाडी सरकारमधील इतर पक्षांची अस्वस्थता पाहून तर ही निवडणूक फडणवीस विरुद्ध आघाडी अशीच झाल्याचं वाटत होतं. अखेरीस पहिल्या आणि दुसऱ्या पसंती ठरवताना फडणवीसांचे डावपेच सुरक्षित ठरले आणि शिवसेनेवर पराभवाची नामुश्की ओढवली. ठाकरे सरकारनं या सर्व गोष्टींचं आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे कारण काहीच दिवसात विधानपरिषदेचा आखाडा रंगणार आहे.