नवी दिल्ली : येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार (Eknath Khadse Rajyasabha) आहे. राज्यसभेसाठी भाजपकडून ज्येष्ठ आणि नाराज नेते एकनाथ खडसे, रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले या तीन जणांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर (Eknath Khadse Rajyasabha) निवडून गेलेल्या 7 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. या 7 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. भाजपकडून खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी राज्यसभेचे तिकीट दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे
उदयनराजेंच्या राजकीय पुनर्वसनाच्या हालचाली, राज्यसभेचं तिकीट मिळण्याची चिन्हं
एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खडसेंचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तर दुसरीकडे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेले माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजकीय पुनर्वसन केले जाणार आहे. उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी भाजपने तयारी सुरु केल्याचं म्हटलं जातं आहे.
राज्यसभेसाठी भाजपकडून तीन उमेदवार
भाजपकडून राज्यसभेसाठी तीन उमेदवार जवळपास निश्चित झाल्याचे म्हटलं आहे. एकनाथ खडसे, रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि त्यानंतरही खडसेंनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली होती.
राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवारही ठरला
राज्यसभेसाठी महाविकासआघाडीला 4 जागा मिळणार आहे. तर राष्ट्रवादीच्या वाटेला 2 जागा मिळणार आहे. या दोन्ही जागांपैकी एका जागेवर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर आता फौजिया खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार (Eknath Khadse Rajyasabha) आहे.