कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) सहाव्या जागेवर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पराभव पक्तरावा लागलाय. भाजपचे धनंजय महाडिक मोठ्या फरकानं विजयी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास लागलेल्या या निकालामुळं भाजपच्या गोटात उत्साह तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गोटात शांतता आणि नाराजीनाट्य पाहायला मिळालं. या पराभवाचं खापर शिवसेनेचे आमदार संजय राऊत यांनी छोट्या पक्षाचे आणि काही अपक्ष आमदारांवर फोडलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी सहा आमदारांची नावंही घेतली. त्यात आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांच्या नावाचाही समावेश आहे. भुयार यांचं नाव घेताना राऊतांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उल्लेख केला. त्यावर राजू शेट्टी चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.
संजय राऊतजी ज्या आमदाराचा उल्लेख तुम्ही स्वाभिमानीचा म्हणून केलेला आहे. त्याच्या बुडावर लाथ घालून पुर्वीच आम्ही हकालपट्टी केलेली आहे. तेव्हा कृपा करुन स्वाभिमानीचा आमदार असा उल्लेख करु नका. त्यांनी स्वाभिमानीचं नाव घेऊन आमची बदनामी करु नये. तो असं का वागला याचं उत्तर राऊतांना अजित पवार आणि जयंत पाटील देऊ शकतात, असं उत्तर राजू शेट्टी यांनी दिलंय.
राज्यसभा निवडणुकीत आमची वाट निसरडी होती. ज्या लोकांनी आम्हाला शब्द दिला तो शब्द पाळला गेला असता तर शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला नसता. वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे संजयमामा शिंदे, नांदेडचे श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार या आमदारांची मतं आम्हाला मिळाली नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केलाय. काही घोड्यांवर जास्त बोली लागली. त्यामुळे बाजारात असलेले घोडे विकले गेले. घोड्यांना हरभरे टाकले की ते कुठेही जातात, अशी टीकाही संजय राऊत यांनी नाव घेतलेल्या अपक्ष आमदारांवर केलीय.
संजय राऊतांच्या आरोपावर आमदार देवेंद्र भुयार यांनीही प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत काय ब्रह्मदेव आहेत का? मतदान गोपनीय असतं. आम्ही दिलं की नाही दिलं हे त्यांना कसं माहिती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मी पहिल्या दिवसापासून आहे. शिवसेना नंतर आली. मी महाविकास आघाडीसोबतच आहे, मी कुठलाही दगाफटका केलेला नाही, असं भुयार म्हणाले.
त्याचबरोबर भुयार यांनी मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केलीय. माझी नाराजी व्यक्तिगत नाही. मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री कमी पडले. त्यांनी वेळ दिला नाही. आमच्यात संवादच होऊ शकला नाही, अशी खंतही भुयार यांनी व्यक्त केलीय. आम्ही हे बोलून दाखवणं गरजेचं आहे. नाहीतर त्यांना कसं कळणार? सर्व आमदारांचे ते प्रमुख आहेत. मग आमचे प्रश्न कुटुंब प्रमुखांना सांगणार नाही तर काय दाऊद इब्राहिमला सांगणार का? असा सवालही भुयार यांनी विचारलाय.