मुंबई : राज्यसभेचा निकाल (Rajyasabha Election Results 2022) , त्याचे अर्थ, अपक्ष आमदारांवर राजकीय पक्षांची असणारी पकड याविषयी बोललं जात आहे. यात एक चर्चा आहे ती एमआयएमच्या 2 मतांची… एमआयएमची (MIM) मतं नक्की कुणाच्या पारड्यात पडली, याविषयी तर्क लावले जात आहेत. महाविकास आघाडीची गणितं पाहता, एमआयएमची दोन मतं थेट शिवसेनेला मिळाल्यास अडचण होऊ शकते त्यामुळे एमआयएमची दोन मतं काँग्रेसला द्यायची आणि काँग्रेसच्या दोन आमदारांनी शिवसेनेच्या संजय पवारांना मतदान करायचं असं गणित होतं. मात्र एमएयएमची मतं नक्की कुणाला पडली याबद्दल साशंकता आहे. ही मतं भाजपच्या (BJP) पारड्यात गेली असल्याचं बोललं जात आहे. तर भाजपने MIM च्या साथीने भाजपने शिवसेनेचा (Shivsena) गेम केला असल्याची चर्चा होत आहे.
ज्या MIM ला सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ‘भाजपची बी टीम’ म्हणून हिणवलं त्यांचा आधार घेत शिवसेनेचा गेम झाल्याचं बोललं जात आहे. कारण इतर पक्षांनी जरी आपल्या आमदारांना व्हिप जारी केला असला तरी, एमआयएम आणि अपक्ष आमदारांची मतं कुणाला दिली जाणार यावर दोन्ही बाजूंनी अनिश्चितता होती. पण मतांची आकडेवारी पाहता MIM ची मतं भाजपकडे वळाली असल्याचं बोललं जातंय.
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एमआयएमला सातत्याने भाजपची बी टीम म्हणून हिणवतं. पण सध्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र एकेका मतासाठी रस्सीखेच झाली. त्यात ज्या एमआयएमवर पदोपदी टीका केली त्याच एमआयएमच्या दोन मतांसाठी महाविकास आघाडीला त्यांच्याशी हात मिळवणी करावी लागली.
एकीकडे सहाव्या जागेसाठी पुरेशी मतं असल्याचं भासवण्यात महाविकास आघाडी व्यस्त होती. तर दुसरीकडे भाजप अपक्षांची मनं आणि मतं आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील होतं. त्यातच त्यांनी एमआयएमलाही आपल्यकडे आकृष्ट करण्यात यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे. त्याचमुळे ती दोन मतंही भाजपला मिळाल्याची चर्चा आहे. थोडक्यात काय तर, ‘बी टीम’ म्हणून हिणवणाऱ्या MIM च्या साथीने भाजपने शिवसेनेचा काटा काढला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.