मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीने (Rajyasabha Election) राज्यात चांगलाचा राजकीय माहोल तापवला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या भात्यातून पहिला बाण बाहेर आला आहे. कारण खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. 26 मेला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती समोर आली आहे. राज्यातून एकूण सहा जागा राज्यसभेवर निवडून दिल्या जाणार आहेत. त्यात महाविकास आघाडीती तिन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा येत आहे. तर भाजपकडून दोन जणांना संधी मिळणार आहे. एका जागेचं गणित अजूनही ठरताना दिसत नाही. या जागे संभाजीराजेंची (Sambhajiraje) वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवसेना मात्र अजूनही ही जागा लढवण्याच्या तयारीत आहे. तर संभाजीराजेंनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक आणखी रंगतदार झाली आहे.
संजय राऊतांची निवड पात्र झाल्यास महाराष्ट्रातून राज्यसभेवर सलग चौथ्यांदा जाणारे ते खासदार असतील. याआधी नजमा हेपतुल्ला महाराष्ट्रातून सलग 4 वेळा तर एकूण सहावेळा राज्यसभेवर निवडून गेले होते. तर काँग्रेसकडून सरोज खापर्डे पाच वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
शिवसेनेकडून पुन्हा संजय राऊत यांनाच संधी देण्यात आलीय. भाजप नेत्यांना रोज आपल्या सामनातील लेखातून आणि रोज होणाऱ्या पत्रकार परिषदातून संजय राऊत टीकेचे बाण सोडत घायाळ करत असतात. संजय राऊत हे देशाच्या संसदेतही थेट धडाडीने बोलतात. कधी ते अमित शाह यांना ओपन चॅलेंज करताना दिसून येतात. तर कधी मोदींनाही आवाहन करताना दिसून येतात. शिवसेना आणि महाविकास आघाडीची बाजू राऊत संसदेत उचलून धरतात.
राज्यातील सहा खासदारांचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक लागली आहे. कार्यकाळ संपलेल्यात शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेसकडून पी. चिदमबरम, भाजपकडून पियुष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, विकास महात्मे, तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा समावेश आहे. यावेळी भाजपकडून विनोद तावडे आणि विजया राहटकर यांची नावं चर्तेत आहेत. काँग्रेसकडून यावेळी कुणाला संधी मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. तर राष्ट्रवादीकडून कुणाला संधी हेही अद्याप कळालेलं नाही. तर शिवसेना ही छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेने पाठिंबा दिल्यास राजेंचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र सेनेने याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.