मुंबई : भाजपचे नेते कृपा शंकर सिंह (Krupashankar Singh) पुन्हा ट्रायडेंटमध्ये (Hotel Triedent) दाखल झाल्याने अनेक सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागले आहेत. एका फॅमिली फंक्शनसाठी आलेले कृपा शंकर सिंह वारंवार ट्रायडेंटमध्ये दिसले आहेत. रुफ टॉपवर कार्यकर्मादर्म्यान ते कोणत्या आमदारास भेटले? याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. कारण शिवसेनेला (Shivsena) समर्थन देणारे तीन आमदार हे आपल्या संपर्कात असल्याचा दवा हा भाजपकडून करण्यात येत आहे. ट्रायडेंट हॉटेलमध्ये शिवसेना आमदार, अपक्ष आमदार हे मुक्कामी असताना एका पाठोपाठ एक भाजपच्या नेत्यांनी ट्रायडेंटमध्ये येण्यास सुरुवात केल्याने वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी आणि भाजप हे दोघेही आपल्या विजयाचा दावा करत आहेत, मात्र गुलाल कुणाचा हे तर निवडणुकीनंतरच कळेल.
या भेटीगाठींच्या चर्चांबाबत कृपाशंकर सिंह यांना विचारले असता ते म्हणाले, मी एका फंक्शनसाठी आलेलो आहे. शिवसेनेच्या आमदारांना भेटण्यासाठी नाही. योगायोगाने आमदार जर भेटले तर त्यांना नमस्कार करेन आणि सांगेल आमचे उमेदवार महाडिकांना मतदान करा, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आमदारांसोबत बैठकसत्र सुरूच ठेवले आहे. त्यांनी अपक्ष आमदारांना आज आपल्या विभागातील कामांची यादी घेऊन मुख्यमंत्र्यांनी बोलावलं होतं. यात किशोर जोरगेवार , आशिष जयस्वाल , चंद्रकात पाटील , विनोद निकोले यांना बोलावण्यात आलं होतं अशी माहिती समोर आला आहे. आम्ही महाविकास आघाडी सोबत आहे आणि महाविकास आघाडी उमेदवारांना मतदान करणार आहे. अपक्ष आमदारांची किंमत आता वाढली आहे. पण आमची कामे व्हावी ही आमची अपेक्षा आहे, तसेच आज संध्याकाळी सहा वाजता महाविकास आघाडीच्या बैठकीत जाणार आहे, अशी प्रतिक्रिया किशोर जोरगेवार यांनी या बैठकीनंतर दिली आहे.
अटीतटीच्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मते कमी होणार आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना उद्याच्या राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा झटका बसल्याचे मानण्यात येत आहे. मलिक आणि देशमुख यांनी मतदानासाठी मागितलेली परवानगी कोर्टाने फेटाळली आहे. मलिक आणि देशमुखांवर टेरर फंडिग सारखे गंभीर आरोप असताना, त्यांना मतदानासाठी बाहेर जाण्याची परवानगी मिळू नये अशी भूमिका ईडीने घेतली होती. त्यावर कोर्टाने आज निर्णय घेत, या दोघांनाही परवानगी नाकराली आहे.