BJP : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची स्पर्धा वाढली; बावनकुळेंपाठोपाठ राम शिंदेंच्या नावाचीही जोरदार चर्चा

| Updated on: Aug 12, 2022 | 2:48 PM

BJP : पश्चिम महाराष्ट्राचा चेहरा आणि शरद पवार यांचे विरोधक म्हणून राम शिंदे यांची ओळख आहे. राम शिंदे हे ओबीसी आहे. धनगर समाजातील असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या व्होट बँकेवर ते प्रभाव पाडू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीचीही अडचण होऊ शकते.

BJP : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची स्पर्धा वाढली; बावनकुळेंपाठोपाठ राम शिंदेंच्या नावाचीही जोरदार चर्चा
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची स्पर्धा वाढली; बावनकुळेंपाठोपाठ राम शिंदेंच्या नावाचीही जोरदार चर्चा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नगर: चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांची शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेटमध्ये एन्ट्री झाल्यानंतर भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? असा सवाल केला जात आहे. त्यासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. मात्र, त्यात चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. बावनकुळे हे ओबीसी समाजातील आहेत. सध्या ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला आकर्षित करण्यासाठी बावनकुळे यांच्याकडे पक्षाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच आता आमदार राम शिंदे (ram shinde) यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर राम शिंदे यांचं राज्याच्या राजकारणात कम बॅक झालं आहे. राम शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्यास भाजपला पश्चिम महाराष्ट्रात आपली पाळंमुळं घट्टं रोवता येणार आहे. त्यामुळे शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या दोन दिवसात भाजपचा प्रदेशाध्यक्ष जाहीर केला जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या पदासाठी आमदार राम शिंदे आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पश्चिम महाराष्ट्राचा चेहरा आणि शरद पवार यांचे विरोधक म्हणून राम शिंदे यांची ओळख आहे. राम शिंदे हे ओबीसी आहे. धनगर समाजातील असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या व्होट बँकेवर ते प्रभाव पाडू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीचीही अडचण होऊ शकते. विशेष म्हणजे राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे विश्वासू मानले जातात, त्यामुळेही राम शिंदे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

नागपूरचे वर्चस्व नकोय म्हणून

राज्यात मोठ्या प्रमाणात धनगर समाज असून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी चेहरा म्हणून राम शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपद मिळू शकते. तर नागपूरला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व असल्याने नागपूर भाजपच सत्ता केंद्र होऊ नये म्हणून बावनकुळे यांचं नाव पिछाडीवर जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद कुणाकडे जाणार हे येत्या दोन चार दिवसात स्पष्ट होणार आहे.

रोहीत पवारांना चेकमेट

दरम्यान, राम शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर कर्जत-जामखेड परिसरात रोहित पवार यांचा प्रभाव वाढला आहे. कर्जत-जामखेडच नव्हेतर पश्चिम महाराष्ट्रात रोहित पवार यांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पवारांच्या राजकारणाला शह देण्यासाठीही राम शिंदे यांना भाजपकडून पुढे केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेलारांकडे मुंबई

आशिष शेलार हे मागच्यावेळी फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. पण त्यांना अवघ्या सहा महिन्याचाच कालावधी मिळाला होता. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शेलार यांचा समावेश होईल असं वाटलं जात होतं. पण त्यांचा या सरकारमध्ये समावेश झाला नाही. शेलार यांच्या ऐवजी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे मुंबईचे अध्यक्षपद शेलार यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे शेलार यांना मुंबईचं अध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. शेलार हे पूर्वीही भाजपचे मुंबईचे अध्यक्ष होते. त्यामुळे ही शक्यता अधिक वाढली आहे.