मुंबई : शिवसेनेमध्ये (ShivSena) फूट पडल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेमधील एका मोठ्या आमदारांच्या गटाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी 38 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देखील सादर केले आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तरी देखील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून सरकार अद्यापही बहुमतात असल्याचा दावा करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणावर आता रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जे बंडखोर आमदार आहेत, त्यांना भाजपाचे बळ असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. हा आरोप देखील रामदास आठवले यांनी फेटाळून लावला आहे. सरकार अल्पमतात असून, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकाही नसल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
आज फडणवीसांसोबत बैठक झाली या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. शिवसेनेमध्ये सध्या जे बंड सुरू आहे त्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. या विषयावर देखील फडणवीसांसोबत बोलणे झाले. मात्र या सर्व प्रकरणात आपला किंवा भाजपाचा हात नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. हा शिवसेनेमधील पक्षांर्गत वाद आहे. आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, आम्हाला कोणतीही घाई नाही, तसेच एकनाथ शिंदेंकडून आम्हाला सध्या कोणता प्रस्ताव देखील आला नसल्याचे फडणवीस यांनी मला सांगितल्याचे आठवले म्हणाले.
दरम्यान बंडखोर आमदारांना निलंबित करावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आठवले यांनी म्हटले की, या आमदारांवर निलंबनाची कारवाई करता येणार नाही. कारण त्या आमदारांची संख्या दोन तृतियांशपेक्षा अधिक आहे. बैठकीला उपस्थित राहिले नाही म्हणून आमदारांना निलंबित करता येत नाही. व्हीप हा सभागृहात जारी होत असतो, सभागृहाच्या बाहेर कोणालाही व्हीप बजावता येत नसल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.