सोलापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांवर सडकून टीका केली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सोडले, तर उरलेल्या वंचितच्या एकाही उमेदवाराला लाखभर मते देखील मिळणार नाहीत, अशी जोरदार टीका आठवलेंनी केली. ते सोलापूरच्या दुष्काळ दौऱ्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शरद पवारांच्या ईव्हीएमबाबतच्या मताशी सहमत : रामदास आठवले
रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ईव्हीएमबाबतच्या मताशी सहमत असल्याचे म्हटले. मात्र, त्याचवेळी त्यांनी पवारांना उपरोधात्मक टोलाही लगावला. आठवले म्हणाले, “शरद पवार यांच्या ईव्हीएमबाबतच्या मताशी मी सहमत आहे. कारण काही ठिकाणी कमळाऐवजी राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान झाले आहे. ईव्हीएम काँग्रेसच्या काळातील आहेत. त्यामुळे सर्व मशिन खराब असू शकत नाहीत.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवारांनी केलेल्या टीकेवर आठवले यांनी मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, “शरद पवारांच्या मते फडणवीस सरकार अनुभवी नसेल, तर फडणवीस सरकारला आणखी 5 वर्षे द्यायला हवीत.”
पवारांच्या सरकारने खूप काम केलं, मग महाराष्ट्र कोरडा का?
दुष्काळाबाबत आठवलेंनी पवारांनाच लक्ष्य केले. शरद पवार हे अनुभवी आहेत. त्यांच्या सरकारने खूप कामे केले आहे. मग तरीही महाराष्ट्र कोरडा कसा? असा थेट सवाल आठवलेंनी विचारला. त्यामुळे दुष्काळाला काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लोकसभेच्या निकालावर बोलताना ते म्हणाले, “महायुतीला महाराष्ट्रात 37 ते 38 जागा मिळतील. सोलापूरची जागा महायुतीकडेच राहिल. देशात युपीएच्या काही जागा वाढतील. काही कमी होतील. मात्र, भाजप 260 पेक्षा जास्त जागा जिंकून सत्ता स्थापन करेल.”