मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष तीव्र झालेला असतानाच विविध पक्षांचे शीर्ष नेते एकमेकांच्या भेटीला जाताना दिसत आहेत. त्यातच आता रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला (Ramdas Athawale meets Sharad Pawar) गेल होते. भर पावसात ‘सिल्व्हर ओक’मधील शरद पवारांच्या निवासस्थानी आठवलेंनी भेट घेतली.
सत्तासंघर्षाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. पवारांचा राजकीय सल्ला घेण्यासाठी आलो होतो, अशी माहिती रामदास आठवलेंनी दिली. तर सेना-भाजपात मध्यस्थी करा, असा सल्ला पवारांनी आठवलेंना दिला.
‘आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी पवारांबद्दल मला आभार आहे. बिघडलेले राजकीय वातावरण कसं निवळायचं याचा त्यांना अनुभव आहे. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात ते अनेक वर्षांपासून आहेत. राज्याचा निकाल लागून 15 दिवस पूर्ण झाले, तरी तिढा सुटत नाही. अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावरुन शिवसेना-भाजपचा वाद सुरु आहे. अशा अडचणीच्या काळात काय करावं लागेल, याचा सल्ला घेण्यासाठी मी पवार साहेबांकडे आलो होते’ अशी माहिती आठवलेंनी दिली.
माझी पवारांशी चर्चा झाली. त्यांचं मत हेच आहे की सेना-भाजपला बहुमत आहे, त्यांनी सरकार बनवायला हवं, असं रामदास आठवले यांनी पवारांसोबतच्या भेटीनंतर सांगितलं.
महायुतीचा भाग असलेल्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे सर्वेसर्वा रामदास आठवलेंनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीसोबत असलेले आठवले नंतर मात्र महायुतीच्या गोटात सहभागी झाले होते.
संजय राऊत पुन्हा ‘सिल्व्हर ओक’वर, पवारांशी नऊ मिनिटांची भेट घेऊन ‘मातोश्री’कडे कूच
दोनच दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेस खासदार हुसैन दलवाई यांनी संजय राऊतांची भेट घेतली होती. त्यामुळे मित्रपक्षाशी चर्चा न करणारे शिवसेनेचे संजय राऊत आघाडीच्या नेत्यांसोबत काय खलबतं करत असल्याचं पाहायला मिळत होतं.
दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेतल्याचं त्यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं होतं. तर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही पवारांच्या करिष्म्याने भारावून जाऊन सिल्व्हर ओकमध्ये त्यांची भेट घेतली होती.
शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत झाली होती. या भेटीत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दोघांमध्ये चर्चा झाली होती. काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. ही भेट रस्ते अपघातांविषयी चर्चेसाठी झाल्याचं नंतर पटेलांनी सांगितलं होतं.
शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 50-50 फॉर्म्युलावरुन दोन्ही पक्षांमध्ये सत्तासंघर्ष सुरु आहे. त्यामुळे हा सत्तास्थापनेचा खेळ कधी थांबणार, याची वाट सर्वसामान्य नागरिक आतुरतेने पाहत आहेत.
Ramdas Athawale meets Sharad Pawar