मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महासेनाआघाडीचं सरकार स्थापनेबाबत हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत सत्तास्थापनेच्या वाटाघाटी सुरु आहेत. शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव चर्चेत आहे. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्याच नावाचा आग्रह धरल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale on Uddhav Thackeray CM) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचंय हे आधी माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता, असं रामदास आठवले म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (Ramdas Athawale on Uddhav Thackeray CM)
रामदास आठवले म्हणाले, “महायुतीचं सरकार यावं यासाठी मी प्रयत्न केले. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही राहिली. पण भाजप ऐकत नाही हे पाहून त्यांना सत्तेबाहेर ठेवायचं हे शिवसेने ठरवलं. जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचे आहे हे आधी समोर आले असते, तर भाजपने पाठिंबा दिला असता”
शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन बाळासाहेबांच्या तत्वाविरोधात आघाडी केली आहे. ही अनैसर्गिक आघाडी आहे. ती किती दिवस टिकेल माहीत नाही, असं आठवले म्हणाले.
बाळासाहेबांचं नाव पुढे करुन शिवसेना आपलं राजकारण करत आहे. बाळासाहेबांचं शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न कधीच पूर्ण झालं आहे, अशीही आठवण रामदास आठवलेंनी सांगितली.
काँग्रेसकडून शिवसेनाला पाठिंबा मिळणार नाही असं वाटलं होतं, पण आता त्यांनी पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील त्यांना शुभेच्छा. त्यांनी जनतेची कामं करावी. आघाडीत मंत्रिपदावरुन वाद होतील, असाही दावा आठवलेंनी केला.
माझा फॉर्म्युला भाजपला मान्य नाही : आठवले
मी मांडलेल्या फॉर्म्युलाला भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही. माझे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत. संजय राऊत काल भेटले, त्यांना 3-2 चा फॉर्म्युला सांगितला, असं म्हणत आठवलेंनी भाजपला 3 तर शिवसेनेला 2 वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला आपण सूचवल्याचा पुनरुच्चार केला.
महासेनाआघाडीचे सरकार शरद पवारांमुळे टिकेल. मी भाजपासोबतच आहे, महासेनाआघाडीसोबत जाणार नाही, बाकीच्या मित्रपक्षांचे माहीत नाही, असंही आठवलेंनी सांगितलं.
संबंधित बातम्या