भाजपाला खरं तर मनसेची (MNS) गरज नाही. भाजप-मनसे युती (BJP-MNS Alliance) झाली तर भाजपाला त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त सहन करावं लागेल. मुंबईतल्या मराठी माणसांसाठी राज ठाकरेंना (Raj Thackeray) भाजप जवळ करत असेल तर देशपातळीवर भाजपाला मोठा फटका बसू शकतो, असा इशारा रिपाइ अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलाय. टीव्ही 9 ऑफिसमध्ये रामदास आठवले यांनी आज पत्रकारांशी दिलखुलास संवाद केला. यावेळी त्यांनी राज्यातल्या सद्यस्थितीवर मोकळेपणाने मतं मांडली.
राज ठाकरेंचं व्यक्तीगत कौतुक करताना रामदास आठवले म्हणले, ‘राज ठाकरे चांगले नेते आहेत. सभा होतात. पण त्यांना मतं मिळत नाहीत. त्यामुळे राज ठाकरेंना भाजपने सोबत घ्यावं हे माझं मत नाही. भाजपला तशी आवश्यकताच नाही…
राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतलं तर त्यांना उत्तर भारतीय, साउथ इंडियन मतं मिळणार नाहीत. मनसेला सोबत घेतलं तर देशपातळीवर नुकसान होऊ शकतं. राज ठाकरेंची भूमिका मराठी माणसांसाठी महत्त्वाची आहे. पण मुंबईतल्या इतर लोकांना विरोध करण्याच्या भूमिकेमुळे भाजपाला हे परवडणारं नाही.
राज ठाकरे यांच्या घरी भाजप-शिंदे सेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आदी नेत्यांच्या भेटी झाल्या. यावर रामदास आठवले म्हणाले, गणपतीत घरी जायला हरकत नाहीत. भेटीसाठी जावं. पण राजकीय युती करु नये.
मनसेला स्वतंत्रपणे लढू द्यावं. तो स्वतंत्र पक्ष आहे. अशा युतीत भाजपाला फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त आहे. दलित समाजातही गैरसमज होऊ शकतो. त्यांनी अपक्ष लढावं. मी त्यांच्यासोबत आहे, असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलंय.
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावर रामदास आठवले म्हणाले, ‘ काँग्रेस क्षीण झाली आहे. गुलाम नबी आझादांनीही काँग्रेस सोडलं आहे. अशोक चव्हाण यांना माझं आव्हान आहे. आपण अत्यंत हुशार राजकारणी आहात. शकरराव चव्हाण यांचे चिरंजीव आहात. मराठवाड्याच्या विकासासाठी असा निर्णय अत्यंत आवश्यक आहेत.
अशोक चव्हाण भाजपात आले तर काँग्रेसमधले टू थर्ड लोकं येतील. राष्ट्रवादीचे टू थर्ड येतील. शिवसेनेचे टू थर्ड.. मनसे मात्र नको.. असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलंय.
भाजप सर्व प्रादेशिक पक्षांचा घात करतोय, असा आरोप केला जातोय. भाजपने शिंदेगट, मनसेला एकत्र घेतलं तर तुमचा पक्ष साईडलाइन होणार का, असा प्रश्न विचारल्यावर रामदास आठवले म्हणाले, मी साईडला जाणार नाही. मी मध्यभागी उभा राहीन.