मुंबई : उच्च न्यायालयाने (High Court) शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा (Dussehra Gathering) होणार हे स्पष्ट केल्यानंतर आता जय्यत तयारीला सुरवात झाली आहे. शिवसेनेचा उत्साह दुणावला आहे तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. असे असताना आता दसरा मेळाव्यावर दोन्ही गटाकडून लक्ष केंद्रित केले आहे. त्याचअनुषंगाने बुधवारी शिंदे गटाची (Eknath Shinde) बैठक पार पडली आहे.दसरा मेळाव्यातील गर्दीच सर्वकाही सांगून जाईल. शिवाय या गर्दीवर शिवसेना कुणाची हे देखील ठरवता येईल त्यासाठी कार्टाच्या निर्णयाची देखील प्रतीक्षा करावी लागणार नसल्याचे मत शिंदे गटाचे रामदास कदम यांनी व्यक्त केले आहे. बीकेसी मैदानावर होणारा मेळावाच हा शिवसेना प्रमुख यांच्या विचाराला घेऊन होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शिंदे गटाला बीकेसी मैदनावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी महापालिकेने दिली आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर हा पहिलाच मेळावा होत आहे. त्यामुळे अधिकची गर्दी कुठे होणार यावरही बरेच काही अवलंबून आहे. तर बीकेसीच्या मैदानावरच बाळासाहेबांच्या विचाराला साजेसा असा मेळावा होईल असे कदमांनी स्पष्ट केले.
यंदा होऊ घातलेल्या दसरा मेळाव्याकडे सबंध राज्याचे लक्ष लागून राहणार आहे. त्यामुळे सर्वस्व पणाला लावून मेळावा पार पाडले जाणार आहेत. मात्र, ज्याच्या मेळाव्याला अधिकची गर्दी त्याची खरी शिवसेना असाच तर्क लावला जाणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयापूर्वी याचा निकाल लागणार असल्याचे कदमांनी सांगितले.
दसरा मेळाव्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही. यासाठी कोणते टार्गेट शिंदे गटाला देण्यात आलेले नाही. तर मेळाव्यासाठी जनता स्वत:हून येईल असा विश्वास शिंदे गटाकडून व्यक्त केला जात आहे. आता दसरा मेळाव्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
खरी ताकद कुणाची ही दसरा मेळाव्यात तर समोर येणारच आहे. यापूर्वी एक नेता, एक झेंडा यामुळे ताकद होती. पण आता आमदार, खासदार यांच्याजवळ राहिले नाहीत तर आता कशाची ताकद असे म्हणत रामदास कदमांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.