खेडः आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) दापोलीत सभा घेतली, त्याच ठिकाणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरेंनी जे जे आरोप लावले, त्या त्या आरोपांना उत्तर देणार असून काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडाही करणार असल्याचं वक्तव्य बंडखोर शिवसेना (Shivsena) नेते रामदास कदम यांनी केलंय. आदित्य ठाकरे यांचा नुकताच कोकण दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली. प्रत्युत्तरासाठी आता शिंदे गटही आक्रमक झालाय. कोकणात आमच्या बळावर शिवसेना उभी ठाकली आहे, त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या आरोपांना कुणीही गांभीर्यानं घेणार नाही, असं रामदास कदम यांनी ठणकावून सांगितलं.
शिंदे गटाच्या मेळाव्यांना रविवारी दापोलीतून सुरुवात होणार आहे. यावेळी शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. आमच्या मेळाव्यांना राष्ट्रवादीचे नव्हे शिवसेनेचेच कार्यकर्ते असतील, असा टोमणाही रामदास कदम यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडलं असतं तर सगळे आमदार तुमच्याकडे आले असते. उद्धव ठाकरेंना मी तसा शब्दही दिला होता. मात्र ऐनवेळी मातोश्रीवर शरद पवार आले आणि उद्धव ठाकरेंनी निर्णय बदलला, असा किस्सा रामदास कदम यांनी सांगितला.
वारंवार खोक्यांचा आरोप करणाऱ्या आदित्य ठाकरेंवरही आता लोकांना संशय येतोय, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय. खोक्यांची भाषा आदित्य ठाकरे आणि मातोश्रीनी करू नये. आत्मपरिक्षण केलं तर एवढं वणवण भटकण्याची गरज पडणार नाही, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय.
आदित्य ठाकरेंवर घणाघाती आरोप करत रामदास कदम म्हणाले, तुम्ही माझ्याही बाबतीत तेच केलंत. आठ दिवस माझ्या बाजूला येऊन बसलात. काका.. काका.. म्हणत शिकले. प्लास्टिक बंदीचा कायदा मीच केला म्हणाले. बाबा मुख्यमंत्री.. मला बाजूला केलं. माझंच खातं घेतलं. याला गद्दारी म्हणत नाहीत का? असा सवाल रामदास कदम यांनी केलाय.