मुंबई – महाराष्ट्रात हनुमान चालीसा आणि लाऊडस्पीकरवरून राजकारण तापल्याचं आपण पाहतोय. नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांनी आज मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा केली आहे. यानंतर राणांच्या इमारतीखाली मोठ्या संख्येने शिवसैनिक उभे आहेत. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली. शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेरील अडथळे तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. अमरावतीचा कचरा साफ करण्यासाठी आलो असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. तसेच राणांच्या घराबाहेर ‘बोल बजरंग बली की जय’अशा घोषणा देण्यात आल्या. राणा दाम्पत्याच्या इमारतीच्या गेटवर मारुतीस्तोत्रच सामुहीक वाचन केलं आहे. सध्या आक्रमक झालेले शिवसैनिक शांत झाले आहेत. परंतु इमारतीच्या बाहेर शिवसैनिकांची गर्दी वाढत आहे.
नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या संख्येने शिवसैनिक ‘मातोश्री’बाहेर उभे आहेत. दरम्यान, रात्री उशिरा तिथून जात असलेले भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवरही संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला. आज रवी आणि नवनीत राणा येथे आल्यास चकमक होण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. या संघर्षाची परिस्थिती पाहता मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवनीत आणि रवी राणा सध्या त्यांच्या खारच्या घरी उपस्थित असून त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित आहेत. त्यांनी राणा दाम्पत्याच्या विरोधात सातत्याने घोषणाबाजी केली आहे. तेही घरातून बाहेर पडले तर आम्ही त्यांना आमच्या शैलीत समजावून सांगू, असे शिवसैनिक सांगतात. नवनीत राणा आणि रवी राणा यांनाही मुंबई पोलिसांनी कलम 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे.
राणा दाम्पत्याने शनिवारी, 23 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाची आठवण करून द्यायची आहे. स्वत : उद्धव ठाकरेही आम्हाला मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्यापासून रोखू शकत नाहीत असंही त्यांनी मीडियाला सांगितले आहे.