माढा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसलाय. मोदी लाटेतही जिंकलेल्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये विजय सिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भाजपात जाण्याचा निर्णय जाहीर केलाय. यासाठी त्यांनी अकलूजमध्ये कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत विचार केल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसमोर ही घोषणा केली. मोहिते पाटलांच्या शिवरत्न या निवासस्थानी कार्यकर्त्यांची विक्रमी गर्दी जमली होती.
माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लढणार असल्याचं बोललं जात होतं. पण त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. विजय सिंह मोहिते पाटील माढ्यातून मोदी लाटेतही जिंकून आले होते. पण यावेळी त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीकडून माजी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे मोहिते पाटील गट नाराज होता. अखेर मोहिते पाटील गटाने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय.
विजय सिंह मोहिते पाटील यांच्याबाबतचा निर्णय अजून समजू शकलेला नाही. पण रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपात जाणार असल्याचं त्यांनी स्वतःच जाहीर केलंय. विशेष म्हणजे रणजित सिंह मोहिते पाटलांनी जेव्हा भाजपात जाण्याचा निर्णय जाहीर केला, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
फक्त माढाच नव्हे, तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात भाजपला मोहिते पाटलांचा फायदा होणार आहे. अनेक वर्ष मोहिते पाटलांनी जिल्ह्यावर वर्चस्व गाजवलं आहे. विजय सिंह मोहिते पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्रीही होते. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग सोलापूर जिल्ह्यात आहे.
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी ज्या ठिकाणी भाजपात प्रवेश केला होता, त्याच ठिकाणी रणजित सिंह मोहिते पाटीलही भाजपात प्रवेश करणार आहेत. पुन्हा एकदा राज्यात वडील एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत रणजितसिंह मोहिते पाटील?
रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र आहेत.
रणजितसिंह हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत.
2009 ते 2012 या कालावधीत रणजितसिंह हे राज्यसभेत होते.
रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. शिवाय, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्षही होते.
सोलापूर विभागाचंही महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतही रणजितसिंहांनी प्रतिनिधित्त्व केले होते.