औरंगाबाद : शिवसेना-भाजप युतीचे औरंगाबादचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या आरोपांनंतर आता अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी पहिल्यांदाच मौन सोडलंय. चंद्रकांत खैरे यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळे ते माझ्यावर बेछूट आरोप करत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी माझ्या पत्नीला सांगितलं की, माझ्या पाठीशी संपूर्ण भाजप लावतो, पण प्रत्यक्ष त्यांनी मला निवडणुकीत काहीही मदत केली नाही, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले.
रावसाहेब दानवे यांनी युती धर्म न पाळता जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत केली, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. भाजपने हा आरोप फेटाळला असला तरी दानवेंनी मदतीचं आश्वासन दिलं होतं, असा खळबळजनक खुलासाच त्यांच्या जावयाने केलाय. दानवेंनी ही ग्वाही युती होण्याच्या अगोदर दिली होती की नंतर याबाबत जाधव यांनी सांगितलं नाही. शिवाय निवडणुकीत माझे कुठलेही पैसे पकडले गेले नाहीत, असंही हर्षवर्धन जाधव म्हणाले.
चंद्रकांत खैरेंनी काय आरोप केले?
दानवेंनी जावयाला आवरलं नाही, असं खैरेंनी म्हटलंय. दानवेंविरुद्ध जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली. पण उद्धव ठाकरे आणि खैरे यांनी खोतकर यांची समजूत काढली आणि खोतकरांनीही दानवेंचा प्रचार केला. ‘दानवेंनी प्रचाराच्या काळातच औरंगाबादच्या रुग्णालयात उपचाराच्या निमित्ताने पाच-सहा दिवस मुक्काम केला आणि राजकीय भेटीगाठी घेत जावयाला मदत केली. दानवेंना खुश करण्यासाठी औरंगाबादच्या भाजपच्या 8 ते 10 नगरसेवकांनीही आपल्याविरुद्ध हर्षवर्धन जाधव यांचं उघडपणे काम केलं. जाधव यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आपल्याविरुद्ध प्रचार केला. दानवे आणि त्यांचे जावई जाधव यांना आवरा’ अशी तक्रार खैरे यांनी अमित शाह यांना भेटून केली. त्यावर शाह यांनी आपल्याला निश्चिंत राहण्याचे आश्वासन दिल्याचे खैरे यांनी सांगितलंय.
भाजपचं स्पष्टीकरण
खैरेंच्या या तक्रारीनंतर भाजपकडून पत्रक जारी करुन प्रतिक्रिया देण्यात आली होती. भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठीच काम केलं. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरुन मी स्वतः मतदारसंघात तीन दिवस मुक्काम करुन भाजप पदाधिकाऱ्यांसह प्रचार केला, असं भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी म्हटलं होतं.