जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे माझी मेहबूबा आहेत. मी त्यांच्यावर प्रेम करतो, तर ते माझ्यावर इश्क करतात, अशा शब्दात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आपल्या मैत्रीमधील प्रेम व्यक्त केले. जालन्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेदरम्यान अर्जुन खोतकर यांनी हे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर जमलेल्या सर्व नागरिकांमध्ये एकच हशा पिकला.
गुरुवारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, शिवसेनेचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांसह विविध भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी हजेरी लावली. या सभेदरम्यान शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी जाहीर सभेत गेली 30 वर्षे राज्याच्या विधानसभेपासून ते लोकसभेपर्यंत आम्ही एकत्र काम केली आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे हे माझी मेहबूबा आहेत. मी त्यांच्यावर प्रेम करतो, तर ते माझ्यावर इश्क करतात, असे वक्तव्य केली. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहनही खोतकरांनी जनतेला केले. विशेष म्हणजे रावसाहेब दानवे केंद्रात गेल्यानंतर त्यांना चांगली जागा द्यावी अशी मागणीही खोतकरांनी अमित शाह यांच्याकडे केली.
शिवसेना-भाजप युती होण्यापूर्वी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांनी एकमेकांवर जबरदस्त टीका केली होती. तसेच अर्जुन खोतकर यांनी जालन्याच्या जागेवर दावा केला होता. तसेच दानवेंना जालन्यात आस्मान दाखवू अशी टीकाही अर्जुन खोतकरांनी केली होती. मात्र युती झाल्यानंतर ही जागा भाजपला देण्यात आली.
रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. दानवे जालन्यातून सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. यंदाच्या लोकसभेसाठी जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 23 एप्रिलला मतदान होणार आहे.