मुंबई : शिवेसना आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप खासदार रावसाहेब दानवे (Abdul Sattar Raosaheb Danve) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “रावसाहेब दानवे हा राज्यातील सगळ्यात धोकादायक नेता आहे. रावसाहेब दानवे यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा अब्दुल सत्तार (Abdul Sattar Raosaheb Danve) यांनी दिला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
सत्तेसाठी भाजपसोबत गेलेले अनेक आमदार आणि नेते महासेनाआघाडीसोबत येणार आहेत. आठ दिवसात सत्तास्थापनेची तयारी पूर्ण होईल, असा विश्वास यावेळी अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. शरद पवार हे चतूर नेते आहेत, ते लवकर सरकार स्थापन करतील, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.
दानवे-सत्तार वादावादी
राज्यात एकीकडे सत्ता स्थापन करण्यावरुन रणकंदन सुरू असताना तिकडे मराठवाड्यात भाजप आणि शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही ठरलं नव्हतं, असं रावसाहेब दानवेंनी म्हणाले होते. नांदेड इथे झालेल्या पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द भाजपाच्या कोणत्याही नेत्याने दिला नव्हता. पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल असं देवेंद्र फडवणीस म्हणाले. अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री असा शब्दप्रयोग कोणीही केला नाही, असा दावा दानवे करत आहेत.
दानवेंच्या या दाव्यानंतर अब्दुल सत्तारांनी त्यांना उत्तर दिलं होतं. रावसाहेब दानवे यांना सेनेवर टीका करण्याचा अधिकार नाही. करार झाला तेव्हा ते दाराबाहेर बसले होते. त्यांना या ठरावाचा काहीच माहित नाही आणि येणाऱ्या लोकसभेत रावसाहेब दानवे हे घरी बसतील, असा सज्जड इशाराही अब्दुल सत्तार यांनी दिला होता.
आज पुन्हा एकदा अब्दुल सत्तारांनी रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला.
शरद पवार-सोनिया गांधींची भेट
दरम्यान, राज्यात शरद पवार यांनी काल दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील सत्तास्थापनेवर चर्चा झाली मात्र शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत चर्चाच झाली नाही असं शरद पवार म्हणाले.