औरंगाबाद : राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपा (BJP) नेते, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) या दोघांनी एकाच वाहनामधून प्रवास केल्याचं पहायला मिळालं. औरंगाबादेत या दोन्ही नेत्यांनी एकाच वाहनातून प्रवास केला आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. याचा सर्वाधिक फटका हा उद्धव ठाकरे यांच्या गटाला बसणार आहे. एकीकडे उद्धव ठाकरे गटाकडून भाजपावर आरोप करण्यात येत आहेत. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे एकाच वाहनातून प्रवास करताना दिसून आले. त्यामुळे राजकीय वर्तृळात या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
शनिवारी निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला जोरदार टोला लगावला आहे. ज्याची भीती होती तेच झालं. यापुढेही योग्य निर्णय येईल अशी खात्री वाटत नाही. शिवसेना संपणार नाही तर ती अधिक जोमाने पुढे येईल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीबाबत देखील भाष्य केलं आहे. महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
आज ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे ठाकरे गट निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.