मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्ष आणि सरकार यांच्यात समन्वय साधण्याचं मोठं काम केलं. त्यामुळे मी त्यांच्या विश्वासावर खरा उतरण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं. तसेच, मी माझी भाषा सोडली तर निवडून येणार नाही, असं म्हणत दानवेंनी त्यांच्या भाषेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना चोख उत्तर दिलं. आगामी विधान सभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज गोरेगावमध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. यावेळी रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
भाजपच्या कार्यकारिणी बैठकिला भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी पक्ष आणि सरकारमध्ये चांगला समन्वय साधला
सत्ताधारी पक्षाचा इतिहास पाहिला, तर कधी पक्षाचा अध्यक्ष रुसतो, कधी मुख्यमंत्री अध्यक्षांबद्दल काही बोलून जातात. पण, आपल्या मुख्यमंत्र्यांनी कधी असा प्रसंगच येऊ दिला नाही. मी बोलका माणूस आहे, मला बोलल्याशिवाय राहावत नाही. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडून कधी तशी वेळच येऊ दिली नाही. त्यामुळे मला कधीही कुठे काहीही बोलायची गरज पडली नाही. त्यांनी पक्ष आणि सरकार यांच्यात चांगला समन्वय साधला. त्यामुळे मी त्यांच्या विश्वासावर खरा उतरण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
मी माझी भाषा सोडली तर निवडून येणार नाही – दानवे
मी अशा ठिकाणी जन्मलो जिथली भाषा तुम्हाला कळत नाही. तुम्हाला माझी भाषा शिकावी लागेल, जर मी तुमची भाषा बोलायला लागलो तर मी जिंकून येणार नाही. माझी भाषा काही लोकांना कळत नाही, असं म्हटलं जातं. मी आतापर्यंत सातवेळा निवडून आलो आहे. जर मी माझी भाषा सोडली आणि तुमची भाषा बोलायला लागलो, तर आठव्यांदा निवडून येणार नाही, असं म्हणत दानवेंनी विरोधकांवर निशाणा साधला. रावसाहेब दानवेंची बोली ही मराठवाड्याची ओळख आहे, असंही दानवे म्हणाले.
चंद्रकांत दादांच्या अध्यक्षपदावरुन मी नाराज नाही – दानवे
मला आज जरा गांभीर्याने भाषण करण्यास सांगण्यात आलं होतं. जर मी गांभीर्याने भाषण केलं, तर कार्यकर्ते समजतील की, अध्यक्षपद गेलं म्हणून मी नाराज आहे. पण मी नाराज नाही. मी आनंदी आहे, मी केंद्रात मंत्री झालो. चंद्रकांत पाटलांना आम्ही सर्वांनी एकमताने अध्यक्ष केलं, असंही दानवेंनी सांगितलं.
काँग्रेसची बरमुडा पॅन्ट झाली
भाजप हा एक परिवार आहे. मात्र काँग्रेस हा परिवाराचा पक्ष आहे. काँग्रेस अध्यक्षांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना नवीन अध्यक्ष मिळत नव्हता. त्यामुळे काँग्रेसचा तुकडे कापून-कापून बरमुडा झाला आहे. आपण 2 वरुन 303 वर गेलो. पण, 303 वर थांबायचं नाही. आता गरिबांनी काँग्रेसला हटवायचं ठरवलं आहे आणि गरिबांचा पंतप्रधान निवडला आहे. एकेकाळी आम्हाला कुणी चहा देत नव्हतं, हार घालत नव्हतं. पण, आम्हाला कधी दुसऱ्या पक्षात जावं, असं वाटलं नाही. कारण, आमच्या मनात पक्षाविषयी निष्ठा आहे, असं म्हणत दानवेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली.
पाहा व्हिडीओ :