रत्नागिरीः कर्नाटकात (Karnataka) बेळगाव (Belgaum) कोर्टाने समन्स बजावल्यानंतरही संजय राऊत (Sanjay Raut) आज कोर्टासमोर हजर झाले नाहीत. त्यांनी वकिलांना पाठवले. यावरून त्यांच्यावर जहरी टीका करण्यात आली आहे. संजयजी आता शेपूट का घालताय? कालपर्यंत डरकाळी फोडणारे संजय राऊत घाबरले का, असा सवाल माजी मंत्री रामदास कदम यांनी विचारला आहे. रत्नागिरीत त्यांनी माध्यमांशी बोलताना राऊतांवर एकानंतर एक प्रश्नांची सरबत्ती केली.
खेड तालुक्यातील जामगे येथे आले असता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केलं. मला देखील कर्नाटक न्यायालयाने समन्स काढले होते व मी सुद्धा कर्नाटकात जाऊन आलो. सीमाभागातील मराठी लोकांनी माझे तिथे स्वागत केले आणि माझ्या जामिनासाठी तिथल्याच मराठी लोकांनी 10 लाखांचे सहकार्य केले होते, अशी माहिती रामदास कदम यांनी दिली.
त्यामुळे संजय राऊत तुम्ही कर्नाटकात जाण्यास घाबरू नका, असा सल्ला रामदास कदम यांनी दिला. ते म्हणाले, ‘ संजय राऊत हे स्वतःला वाघ समजतात. तुम्ही का घाबरता? माझ्यावर हल्ला होईल… आपला मराठी माणूस एवढा घाबरतो, हे दाखवू नका. संजयजी तुम्ही शेपूट घालू नका. तुमच्यात एवढा अचानक का बदल झाला?
मला जामीन दिला तसा तिथे गेल्यावर तुम्हालाही देतील. मराठी माणसे खंबीर आहेत.. संजयजी तुम्ही घाबरू नका आणि मराठी माणूस पळपुटा आहे असा संदेश देऊ नका, तुम्ही कर्नाटकात जा तेथील मराठी लोक तुमच्या बाजूने ठामपणे उभे राहतील, असा सल्ला देखील रामदास कदम यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
30 मार्च 2018 रोजी बेळगाव येथे प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी संजय राऊत यांना कोर्टाने समन्स बजावले होते. आज 1 डिसेंबर रोजी बेळगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र कर्नाटकात गेल्यावर माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातोय, मला अटक केली जाईल, अशी भीती संजय राऊत यांनी वर्तवली होती. आज 1 तारखेला कोर्टात वकिलांनाच पाठवणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी काल दिली होती.