अमरावती : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनं शिवसेना दुभंगली आहे. आता पक्ष संघटना आणि चिन्ह वाचवण्यासाठी ठाकरेंची धरपड सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी ठाकरे पितापुत्र पुन्हा एकदा शिवसेनेला (Shivsena) उभारी देण्यासाठी राज्याचा दौरा करत आहेत. तर दुसरीकडे संजय राऊतही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवताना दिसत आहेत. शिंदे गटातील आमदारांकडूनही संजय राऊत यांना टार्गेट केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. आता अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनीही संजय राऊतांवर खोचक टीका केलीय. संजय राऊत हे पवारांचे नंदी आहेत, ते उद्धव ठाकरे यांचं राहिलेलं अस्तित्व बुडवूनच शांत बसतील, अशी टोला रवी राणा यांनी लगावलाय.
संजय राऊत हे शरद पवारांचे नंदी आहेत. राऊत यांनी सामना पेपर सांभाळला पाहिजे. राऊत पवारसाहेबांच्या हृदयात जाऊन बसले आहेत. राऊत पवारांचे पगारी नोकर झालेत. राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे, असा प्रश्न पडतो. ते उद्धव ठाकरेंचं राहिलेलं अस्तित्व बुडवूनच शांत बसतील, अशा शब्दात रवी राणा यांनी संजय राऊतांवर हल्ला चढवला.
रवी राणा पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या हातातून बाजू सुटत चालली आहे. पायाखालची वाळू सरकली आहे. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना गमावून बसले आहेत. शिवसेनेचे चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळणार. शिवसेना भवन हे एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात येईल, असा दावाच रवी राणा यांनी केलाय.
मंत्रिपदाबाबत विचारलं असता राणा म्हणाले की, मी मंत्रिपद मागितलं नाही, मागणार नाही. मी कार्यकर्ता आहे. मात्र, संधी मिळाली तर तळागाळातील लोकांसाठी काम करेल. नवनीत राणा यांना जरी मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर त्या चांगलं काम करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह निर्णय घेण्यास सक्षम आहेत.