मुंबई : मागच्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात टोकाचा वाद सुरु होता. त्यावर आता पडदा पडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा (Ravi Rana) यांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची जाहीर माफी मागितली आहे.
बोलण्याच्या ओघात माझ्याकडून काही शब्द गेले. त्यामुळे बच्चू कडू नाराज झाले. त्याचसोबत काही मंत्री, आमदारही नाराज झाले. माझ्या बोलण्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझी मागतो, असं रवी राणा म्हणालेत.
बच्चू कडू दुखावले गेल्याने मी त्यांची माफी मागतो. पण त्यांचीही काही विधानं जिव्हारी लागणारी होती. त्यामुळे बच्चू कडू यांनीही आपलं विधान मागे घ्यावं, असं रवी राणा म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. त्यांचा आदेश आमच्यासाठी महत्वाचा आहे. फडणवीस यांनी अनेक अडचणीच्या प्रसंगातून मार्ग काढत असतात. या प्रसंगातूनही त्यांनी मार्ग काढला. त्यांचा आदेश पाळत मी दुखावलेल्या नेत्याची माफी मागतो, असं रवी राणा म्हणालेत.
रवी राणा यांनी काही दिवसांआधी एक विधान केलं. त्यात बच्चू कडू यांनी खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. रवी राणा यांच्या आरोपांनंतर बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला. मी कुठलेही पैसे घेतलेले नाहीत. त्यामुळे हे असे आरोप करणं चुकीचं आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. शिवाय सत्ताधारी पक्षातील नेत्यानेच असे आरोप केल्याने सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलं होतं.
रवी राणा यांनी माफी मागावी, या मागणीवर बच्चू कडू ठाम होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू यांची जाहीर माफी मागितली आहे.