नवी दिल्ली : आजपासून विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू झालंय. दोन दिवसीय चालणाऱ्या अधिवेशनात पहिल्या दिवशी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि सर्वपक्षीय आमदारांनी भाषणं केली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एक विधान केलं. थोरातांचं हे विधान शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील संघर्षात काँग्रेसची ठिणगी तर नाही ना, असंही बोललं जातंय. बाळासाहेब थोरात यांनी भाषण करताना आधी विधानसभेच्या अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना त्यांनी एक विधान केलं. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं विधानसभेत हे विधान केल्यानं ते प्रचंड चर्चेत आलंय. थोरात म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेत,’ असं विधान बाळासाहेब थोरात यांनी केलं. यावरुन अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. महाविकास आघाडीमधील काँग्रेस हा पक्ष एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री मानतो का? असे अनेक प्रश्न थोरातांच्या विधानावरुन सध्या चर्चेत आले आहेत.
विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी भाषणं केली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील भाषण केलं. त्यांनी यावेळी गिरीश महाजन यांच्या आडून देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. ते म्हणाले की, ‘फडणवीसांनी शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा करतात भाजपची लोकं इतकी रडायला लागली. गिरीश (महाजन) यांचं तर रडणं थांबलेलंच नाही. ते अजूनही रडत आहे. गिरीश तर फेटा सोडून डोळ्यालाच लावतो की काय असं झालं होतं. सगळ्यांना मोठा धक्का बसला होता, असा चिमटा काढतानाच कुणी काहीही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनात धाकधूक आहेच. प्रत्येकानं सदसदविवेक बुद्धीला विचारून सांगा, की मनाला शांती झालीये का… असा सवाल त्यांनी बंडखोर आमदारांना केला.
विशेष अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी अध्यक्षांची निवड करण्यात आलीय. मधल्या काळात नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नरहरी झिरवळ यांनाी प्रभारी अध्यक्ष म्हणून काम केलं. त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.