मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उद्याच बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार असल्याचा निर्णय दिला. यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका बसल्यानं अविश्वास ठरावाला सामोरं न जाता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा (CM) राजीनामा दिलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केलेल्या फेसबूक लाईव्हमध्ये सुरुवातीलाच ठाकरेंनी अडीच वर्षांत केलेल्या प्रमुख योजनांचा पाढा वाचला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या शेतकरी, पोलीस कर्मचारी यांच्यासाठीच्या योजनांसह औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरणाचाही उल्लेख केलाय. यावेळी मुख्यमंत्री भावनिक झाल्याचंही दिसून आलंय. उद्धव ठाकरेंनी कोणत्या योजनांचा उल्लेख केला जाणून घ्या…
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनतेशी संवाद – LIVE https://t.co/ogsYKE1vvk
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 29, 2022
हे सुद्धा वाचा
ठाकरेंनी सुरुवातीला अडीच वर्षांत केलेल्या योजनांचा पाढा वाचला. यावेळी त्यांनी काही गोष्टी बाजूला पडतात म्हणून सांगतोय, असंही म्हटलंय. तर भाषणादरम्यान त्यांनी माझ्यासोबत फक्त चार मंत्री शिवसेनेचे होते असंही भावनिक होऊन म्हटलंय. यावरुन त्यांना शिवसेनेच्या भविष्याविषयी चिंता वाटत असल्याचं स्पष्ट दिसून आलं. त्यामुळे त्यांनी अडीच वर्षांत आणलेल्या प्रमुख योजनांचा उल्लेख केल्याचं जाणकार सांगतात.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला म्हटलं की, ‘मातांनो, बंधूंनो आणि भगिनींनो. पुढची वाटचाल तुमच्या सहकार्यानं चांगली झाली. सरकार म्हणून काय केलं. सुरुवातच आपण रायगडला निधी देऊन सुरुवात केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. आता पीक विमा योजनेचे बीड पॅर्टनही करू घेतले. या सर्व धबडग्यात तुम्ही विसरणार नाही पण काही गोष्टा बाजूला पडतात म्हणून सांगतो. आज आयुष्य सार्थकी लागलं अशी भावना आहे. कारण औरंगाबादला संभाजीनगर नाव दिलं. उस्मानाबादला धाराशीव दिले. ज्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो. मी मुख्यमंत्री आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना भुखंड देण्याचं मान्य केलं. एखादी गोष्ट चांगली चालली की त्याला दृष्ट लागते. कुणाची ते तुम्हाला माहीत आहे.’
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ठाकरे सरकारला मोठा झटका बसलाय. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या विरोधात गेला. त्यामुळे उद्याच ठाकरे सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावं लागणार होतं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आजच राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं.