ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघात विद्यमान भाजपा खासदार कपिल पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आणलेल्या विकासकामांना सर्वसामान्य मतदारांनी पसंती देत मोदी लाटेपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आणलंय. या मतदारसंघात जातीय समीकरणे, पक्षांतर्गत विरोध या प्रभावी ठरणाऱ्या बाबी नगण्य ठरल्या असल्याचं या निकालावरून स्पष्ट झालंय.
2014 मध्ये कपिल पाटील यांनी काँग्रेस उमेदवार विश्वनाथ पाटील यांचा 109450 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर स्थानिक पातळीवर युतीतील मित्र पक्षांमध्ये निर्माण झालेले वितुष्ट, यानंतर ऐनवेळी पुन्हा भाजप-शिवसेना यांची झालेली युती या पार्श्वभूमीवर कपिल पाटील यांना ही निवडणूक जड जाणार असा कयास लावला जात होता. या मतदारसंघात कपिल पाटील यांनी 523583 मते मिळवली, तर काँग्रेसचे सुरेश टावरे यांना 367254 मतांचा पल्ला गाठत आला. कपिल पाटील यांनी सुरेश टावरे यांचा 156329 मतांनी पराभव केल्याने सर्वच अचंबित झाले. या विजयात कपिल पाटील यांनी मागील वेळेस मिळवलेल्या मताधिक्याची आघाडीही 46879 मतांनी वाढवली हे विशेष.
वाद दूर करण्यात एकनाथ शिंदेंना यश
मागील निवडणुकीच्या तुलनेत कपिल पाटील यांनी कल्याण पश्चिम, मुरबाड, भिवंडी ग्रामीण, शहापूर या चारही विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आणि त्यासोबत राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आणलेल्या विकासनिधीच्या जोरावर निवडणुकीत मतदारांना सामोरे गेले. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खरी ताकद शिवसेनेची आहे, परंतु मतदारसंघ भाजपच्या वाट्याला असताना शिवसेना पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांनी सुरुवातीला काही कुरबुरी असताना शिवसैनिकांचा राग शांत केला. त्यांना प्रचाराच्या कामात सक्रियच केले नाही, तर त्यांच्यावर प्रचाराची धुरा देत त्यांना यशाचे शिलेदार बनवलं. त्यामुळे सुरुवातीला उघड उघड दिसणारी कटुता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पेल्यातील वादळ ठरत गेलं.
मतदारसंघनिहाय मतांचं विश्लेषण
मागील निवडणुकीत काँग्रेसचे विश्वनाथ पाटील या भिवंडी शहरासाठी अनोळखी उमेदवारास भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम या अल्पसंख्याक बहुल विधानसभा क्षेत्रातून तब्बल 120457 मते मिळावत 36638 मतांची आघाडी कपिल पाटील यांच्यावर घेतली होती. या वेळी सुरेश टावरे या भिवंडी शहरातीलच उमेदवाराकडून फार मोठ्या अपेक्षा असताना सुरेश टावरे यांना या दोन मतदारसंघातून 149201 मते मिळविता आली. त्यामुळे या ठिकाणी सुरेश टावरे यांना कपिल पाटील यांच्यावर 49327 मतांची आघाडी घेता आली. हे चित्र पाहिल्यास मागील निवडणुकीच्या तुलनेत सुरेश टावरे यांना आपल्या आघाडीत अवघी 12089 मतांची वाढ करता आली.
सुरेश टावरे यांना या दोन्ही विधानसभा मिळून एकूण 149201 मते मिळविता आली, तर गत निवडणुकीत भाजपचे कपिल पाटील यांनी याच मतदारसंघात 63819 मते मिळविली होती. परंतु मागील पाच वर्षात भिवंडी शहरातही विकासकामांचा झपाटा कपिल पाटील यांनी उभा केल्याने या वेळी त्या मतांमध्ये वाढ करण्यात यशस्वी होत तब्बल 99874 मते मिळवत 16055 मतांची वाढ करण्यात यशस्वी झाले आहेत. मागील निवडणुकांची परंपरा कायम राखत कपिल पाटील यांनी भिवंडी ग्रामीण, मुरबाड, कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात आघाडीच घेतली नाही, तर त्या आघाडीत भरघोस वाढ करत विरोधकांचे मनसुबे उधळवून लावले.
काँग्रेसला अंतर्गत वादांचा फटका
निवडणुकीच्या सुरुवातीपासून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही बाजूने विरोधाची ठिणगी उमेदवारांना विरोधात पडली होती. त्यात शिवसेनेचे जिल्हा परिषद सभापती सुरेश बाळ्या मामा म्हात्रे हे आघाडीवर होते. त्यांच्या समर्थकांसह विरोधामुळे सुरुवातीच्या महायुतीच्या मनोमिलन सभांमधून खासदार कपिल पाटील यांना शिवसैनिकांची माफी मागत दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. त्यामुळे वातावरण पोषक नसताना कपिल पाटील यांच्या पाठीशी पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी खंबीरपणे उभे राहत युती धर्म पाळण्याचं आवाहन केलं. काँग्रेसमध्ये असणारे विश्वनाथ पाटील यांनी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली. परंतु संघटनेच्या नावाने समाजावरील पकड सुटत असल्याचे ध्यानात आलेल्या कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी वेळीच भाजपा महायुतीस समर्थन देण्याचा निर्णय जाहीर करत कपिल पाटील यांचे बळ वाढविले. पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीतून भाजपात दाखल होताना तालुक्यातील नेस्तनाबूत केलेली राष्ट्रवादी त्या माध्यमातून तयार केलेली कार्यकर्त्यांची फळी, यामुळे कपिल पाटील यांना प्रचारात माणसांची गर्दी कधी कमी भासलीच नाही. या जमेच्या बाजू सांभाळत प्रचार सुरु केल्यानंतर स्थानिक युतीतील आमदार किसान कथोरे, नरेंद्र पवार, महेश चौघुले, रुपेश म्हात्रे, शांताराम मोरे यांसह सर्वसामान्य महायुतीतील कार्यकर्त्यांची साथ लाभल्याने कपिल पाटील यांना हा अभूतपूर्व अनपेक्षित असा विजय मिळविता आला.