मुंबई: काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात नाराजी वाढल्यानं अखेर दिल्लीतील नेत्यांना महाराष्ट्रात लक्ष देण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचा लोकसभा उमेदवारीचा घोळ, राष्ट्रवादीचा नको तितका हस्तक्षेप वाढल्याने काँग्रेसमध्ये नाराजी वाढतोय. त्यामुळं केंद्रीय नेतृत्वानं गंभीर दखल घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाअंतर्गत कलह संपता संपत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची पक्षावरची मजबूत कमांड कमी झाली म्हणून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीतून नेत्यांना मुंबईत यावं लागलं. या नेत्यांनी काँग्रेसमधला कलह कमी करण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती आहे.
दिल्लीतून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी के सी वेण्णूगोपाल आणि नव नियुक्त महाराष्ट्र निवडणूक निरीक्षक मधुसुदन मिस्त्री मुंबईत आले. त्यांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. पण निवडणूक दृष्टीकोनातून ही बैठक असल्याचं सांगण्यात आलं.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षात धुसफूस का आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे.
काँग्रेसचा निवडणुकीत आक्रमक पवित्रा दिसायला हवा होता, तो त्या तुलनेनं दिसत नाही. त्यामुळे आधीच पक्षात मरगळ आली की काय असं वाटू लागलं आहे. एकीकडे राष्ट्रवादी प्रचारात आघाडीवर असताना, काँग्रेस मात्र बँकफूटवर आहे. त्यामुळं केंद्रीय नेतृत्वाची दखल महत्त्वाची ठरत आहे.