मुंबई : गुवाहाटीमधील बंडखोर आमदार हे जिवंत प्रेतं आहेत, त्यांच्या शरीरातील आत्मा कधीच मेलाय, अशी जळजळीत टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. दहिसरमधील शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. संजय राऊतांनी केलेल्या या वक्तव्यावर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानं बंडखोर आमदारांना (Rebel MLA Eknath Shinde News) संताप व्यक्त केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जर आम्ही प्रेतं असू, तर याच प्रेतांनी तुम्हाल राज्यसभेवर निवडून आणलं आहे, असंही ते म्हणालेत. त्यामुळे बेताल वक्तव्य करण्याआधी तुम्ही राज्यसभेची खासदारकी सोडा आणि पुन्हा निवडणूक येऊन दाखवा, असं म्हणत दीपक केसरकर यांनी राऊतांना उत्तर दिलंय. राऊत जेवढ्या वाईट भाषेत बोलणार, तेवढी आमची ऐकी वाढणार, असा विश्वास दीपक केसरकर यांनी यावेळी बोलून दाखवला.
बंडखोर आमदार शिवसेना पक्षावर दावा करणार असल्याच्या प्रश्नावरही केसरकरांनी सविस्तर भूमिका मांडली. आम्ही ओरिजनल पार्टीचा दावा करत असल्याचं भासवलं जातंय. आणि त्यातून महाराष्ट्रात दंगली घडवल्या जात आहेत, असा आरोप केसरकरांनी केलाय. आम्ही कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केली आहे. कायद्यावर आमचा विश्वास आहे. कायदेशीर प्रक्रियेनंतर आम्ही ज्या गोष्टी गरजेच्या असतील, त्यानुसार निर्णय घेऊ असंही ते म्हणालेत.
सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बातचीत केली. यावेळी त्यांनी आपली सविस्तर भूमिका एका पत्रकाद्वारे प्रसिद्ध करणार असल्याची माहितीही दिली. तसंच सुप्रीम कोर्टात आमचाच विजय होईल, कारण बहुमत आमच्याकडे आहे, असं त्यांनी म्हटलंय. चुकीचे सल्ले देणाऱ्यांमुळे शिवसेना अडचणीत आल्याचं त्यांनी म्हटलंय.
केसरकरांनी यावेळी पवारांच्या रणनितीवरही टीका केली. ‘इलेक्शन इज अ गेम ऑफ सायकोलॉजी… तो फॅक्टर वापरुन फूट पाडता येते का, हा त्यांचा प्रयत्न आहे’ असं म्हणत महाविकास आघाडीची रणनिती कळली असल्याचं केसरकरांनी म्हटलं आहे. तसंच पवार साहेबांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे अधिक आक्रमक झाले असल्याचंही विधान त्यांनी केलं. त्याआधी बंडखोरांसोबत तडजोडी, सामंजस्याची भाषा उद्धव ठाकरे यांची होती, असंही ते म्हणालेत.