प्रभादेवीतील गोळीबारप्रकरण आमदार सदा सरवणकर यांना भोवणार? सरवणकरांवर गुन्हा दाखल, पिस्तुलही जप्त

| Updated on: Sep 13, 2022 | 11:16 AM

Sada Sarvankar News : शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील हाणामारीचा प्रकार शनिवारी रात्री घडला होता. पोलीस स्थानकाच्या समोरच सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. सदा सरवणकर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते.

प्रभादेवीतील गोळीबारप्रकरण आमदार सदा सरवणकर यांना भोवणार? सरवणकरांवर गुन्हा दाखल, पिस्तुलही जप्त
मोठी बातमी...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : शनिवारी रात्री प्रभादेवीमध्ये (Prabhadevi Political Fight) राडा झाला होता. शिंदे गट विरुद्ध शिवसैनिक (Shinde vs Shiv sena) यांच्यात घमासान झालं होतं. अखेर या संपूर्ण राड्याप्रकरणी महत्त्वाची अपडेट हाती येते आहेत. आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांच्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे आता सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे, तर सदा सरवणकर यांचं पिस्तुलही पोलिसांनी जप्त केलं आहे.

सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी केला होता. या गोळीबारातून एक पोलीस जखमी होता होता वाचला होता, असंही सुनील शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात होती.

संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांनी शनिवारी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर प्रभादेवीत राडा झाला होता. मध्यरात्री झालेल्या या राड्यानंतर अनेक शिवसैनिकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यापैकी पाच शिवसैनिकांना अटकही करण्यात आली होती. दरम्यान, आता सदा सरवणकर यांच्यावर देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात हाणामारीचा प्रकार शनिवारी रात्री घडल्यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. या राड्याची सुरुवात गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशीच झाली होती. स्वागत कक्षावरुन शिवसेना विरुद्ध शिंदे गट आमने सामने आला होता. दरम्यान, शनिवारी पोलीस स्थानकाच्या समोरच सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला. सदा सरवणकर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते. घरगुती भांडण झाल्याची प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.

आता पोलिसांनी सदा सरवणकर यांच्याकडे लायसन्स असलेलं पिस्तुल जप्त केलं आहे. आता खरंच त्यांनी गोळीबार केला होता का, याची चौकशी आता पोलिसांकडून केली जाणार आहे. सदा सरवणकर, समाधाना सरवणकर यांच्यावर आर्म्स एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी पुढे दादर पोलिसांकडून कारवाई केली जाते आहे.