नाशिक : (Eknath Shinde) एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार हे (Shivsena) शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा खा. अनिल देसाई, खा. संजय राऊत एवढेच मंत्री आदित्य ठाकरे यांनीही केला होता. मात्र, यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी तर सांगितलेच पण आता बंडखोर आमदार हे समोर येऊन स्पष्टीकरण देत आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदगावचे आमदार (Suhas Kande) सुहास कांदे यांनी तर एकनाथ शिंदे हेच आपले नेते आणि पक्ष असल्याचे सांगितले आहे. नांदगाव मतदार संघातील विविध विकास योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. शिवाय आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेकडून जो दावा केला जात आहे तो खोडून काढण्याचा प्रयत्न बंडखोर आमदार करीत आहेत.
नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी मतदार संघातील विकास कामे मार्गी लावण्याच्या अनुशंगाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आह. शिवाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी आपण प्रमाणिक असून त्याच मार्गाने पुढे जाणार आहोत. हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. शिवाय शिंदे गटात सहभागी होण्यासाठी कोणीही माझ्यावर दबाव आणला नसून आपण स्वता:हून या गटामध्ये सामील झालो असल्याचे कांदे यांनी सांगून केलेले आरोप खोडून टाकले आहेत.
सध्या बंडखोर आमदार हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आपण एकनाथ शिंदे यांच्याशिवाय कुणाच्याही संपर्कात नसल्याचे कांदे यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदे वगळता आपण कुणाच्याही संपर्कात नसल्याचे सांगत शिंदे गट किती एकजूट झाला आहे हे सांगण्याचा प्रयत्न आता बंडखोर आमदार करीत आहेत. त्यामुळे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्नही काहीजणांकडून केला जात असला तरी यामध्ये तथ्य नसल्याचे सुहास कांदे यांनी सांगितले आहे.
शिवसेनेतील काही नेत्यांकडून 20 ते 25 बंडखोर आमदार संपर्कात असल्याचे सांगण्यात येत होते. पण हे सर्व आरोप एकनाथ शिंदे यांनीच खोडून काढले होते. तर संपर्कात असलेल्या एक किंवा दोन आमदारांची नावे तरी सांगा असे खुले आव्हान त्यांनी सेनेच्या नेत्यांना केले होते. त्यानंतर बंडखोर आमदार समोर येऊन आपली भूमिका मांडत आहेत.