मुंबई : (Eknath Shinde) एकनाथ शिंदे गटाला सत्ता स्थापनेचा दावा करण्याचा मार्ग खुला झाल्यापासून (Maharashtra Politics) राज्याच्या राजकणात अनेक घडामोडी मोठ्या वेगाने घडत आहेत. आतापर्यंत शिवसेनेकडून बंडखोरांना पक्षात परत येण्याबाबत भावनिक साद घालण्यात तर दुसरीकडे कारवाई करण्याचाही मार्ग खुला असल्याची आठवण करुन दिली मात्र, दिवसेंदिवस बंडखोरांची संख्या ही वाढतच गेली आहे. एकनाथ शिंदे आपल्या निर्णयावर ठाम असून बाळासाबेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व या दोन मुद्यापासून आपण दूर जाणार नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहेत. तर दुसरीकडे (Rashtrawadi Party) राष्ट्रवादीबद्दल प्रत्येक आमदाराने नाराजी व्यक्त केली आहे. या पक्षाकडून कशी दुय्यम वागणूक दिली जाते याचा पाढाच आमदाराने वाचून दाखवला आहे. असे असतानाही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका पार पाडलेल्या राष्ट्रवादीच्या गोटात कमालीची शुकशुकाट पाहवयास मिळत आहे.
शिवसेनेतील आमदारांचे बंड हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत मतभेद असला तरी बंडखोर आमदारांनी ही वेळ केवळ राष्ट्रवादीतील नेत्यांमुळे आल्याचे जाहीर सांगितले आहे. आपण सत्तेत असूनही दुय्यम वागणूक आणि निधी वाटपात केला जात असलेला दुजाभाव आता काय लपून राहिलेला नाही. अशी उघड टिका होत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबत आपले मत व्यक्त करण्यास टाळाटाळ केली आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांना विचारणा केली असता तर त्यांनी कोपऱ्यापासूनच होत जोडले होते. तर धनंजय मुंडे यांनीही अशा प्रश्नाकड़े दुर्लक्ष केले.
शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट बाहेर पडण्यामागे भाजपाचा हात असल्याचे अध्यक्ष शरद पवार यांनी अगदी सुरवातीला सांगितले तर या सर्व प्रकरणात भाजपाचा काही रोल नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. शिवाय याबाबतीत अजित पवार यांना फारशी माहिती नसल्याचे म्हणत शरद पवार यांनी भाजपालाच टार्गेट केले होते. त्यांच्या या भूमिकेनंतर मात्र, अजित पवारांनी आपला मुद्दा हा खोडून काढला होता.
राष्ट्रवादीतील अनेक नेते हे शिवसेनेतील बंडखोर आमदारांकडून होत असलेल्या टिकेबाबत माध्यमासमोर येत नाहीत. शिवाय प्रमुख नेत्यांना कोरोना झाल्याने आपली प्रतिक्रिया ही पक्षाला मान्य असेल का असाही अनेकांना प्रश्न आहे. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण असल्याने ते क्वारंटाईन आहेत. तर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे राष्ट्रपती निवडणुकीच्या अनुशंगाने दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडीपासून राष्ट्रवादी ही अलिप्त असल्याचे चित्र आहे.