मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) काहीच दिवसांपूर्वी अडीच वर्षे पुर्ण झाली. त्यावेळी हे सरकार पाच वर्षे टिकेल असे तिन्ही नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीत काही मतं फुटली आणि त्याचं खापर शिवसेनेवर फोडण्यात आलं. त्यानंतर पुढील महिन्यातच विधानपरिषद निवडणुकीतही या सरकारला धक्का बसला आणि भाजपचे पाच आमदार निवडूण आले. यानंतर लगेच महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेला भूकंपाचा सामना करावा लागला. ज्यात शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी धक्का दिला. शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त करताना याचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फोडलं. तसेच या नाराज आमदारांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप केला. आता हाच आरोप शिंदे गटातील चारआमदार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. तर या महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी ही सामिल झाली. तर खाद्यावर भगवा घेऊन जाणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्याला आशा होती, की आता विकास होईल, आमची कामं होती. मात्र त्या अपेक्षा फोल ठरल्या. त्यांची कामं ही झाली नाहीत. दरम्यान आम्हाला राज्यात शिवसंपर्क अभियावर पाठवलं गेलं. मात्र त्यावेळी निधीचं सत्य समोर आलं. तर शिवसेनेचे आमदार सांगायचे आम्हाला निधी मिळत नाही. राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांनी निधी थांबवण्याचं काम केल्याचेही ते बोलत. आधी विरोधात असताना आम्ही थेट सांगू शकत होतो की आम्हाला निधी मिळत नाही. पण आता तेही बोलता येत नाही. आज सत्तेत असून आमच्यावर अन्याय होत असेल तर काय फायदा अशा सत्तेचा?
शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे नेते आणि माजी गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी देखील या परिस्थितीला राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे म्हटलं आहे. त्यांनी आज शिंदे गटाची भूमिका सांगताना हा मुद्दा स्पष्ट केला. तर केसरकर म्हणाले, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्हाला आमच्या नेत्यावरही कोणतेही आरोप करायचे नाहीत. आमची शिवसेना ही बाळासाहेबांची आहे. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंविरोधात बोलणार नाही. राज्यात शिवसेना संपविण्याचे काम हे राष्ट्रवादीकडून केलं जात आहे. सेनेतील आमदार मला सांगत असतात की, राष्ट्रवादी ही शिनसेना संपवत आहे. मग आम्ही कसं सहन करायचं. शिवसेनेमुळेच राष्ट्रवादी सत्तेत आली. आणि शिनसेनेलाच संपवायचा प्रयत्न राष्ट्रवादी करत असल्याचाही आरोप केसरकर यांनी केला.
तर शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. शिरसाट यांनी आरोप करताना, शिवसेनेत भांडणं लावून राष्ट्रवादी मजा पाहतेय, असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पाईक आहोत गद्दार नाही, असेही म्हटलं आहे. तर त्यांनी अजित पवार यांच्याबाबत कितीतरी वेळा उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांनी असंही म्हटलं आहे की, निधी वाटपावरून अनेक पत्रे दिली आहेत. एका आमदाराची पन्नास पन्नास पत्रे तिथे असतील. ती ही तपासून पहावीत. त्यावर कारवाई झालेली नाही. तर उद्धव ठारके यांच्याकडे त्याबाबत व्यथा मांडल्या. मात्र त्यावरही कोणतेच आश्वासन ठाकरे यांनी दिले नाही. त्यांनी प्रश्न सोडवले नाहीत असा ही आरोप शिरसाट यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात आमदार शहाजी बापू पाटील हे ही सामिल झाले. तसेच या बंडात समिल होताना त्यांनी देखील याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार असल्याचे म्हटलं आहे. यावेळी अजित पवारांवर आरोप करताना त्यांनी, अजित पवार हे सुडानेच पेटलेले असतात. ते वेडे आहेत. मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असताना देखील त्यांच्या पाया पडलो. बुटाला हात लावतो. तरी त्यांची अढी काही जात नाही, अशी टीका केली होती.
दरम्यान शिंदे गटात सामिल झालेले आमदार महेश शिंदे यांनी देखील निधी वाटपावरून अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच अजित पवार यांच्या अशा वागण्याला कंटाळूनच आपण शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिंदे यांनी याबाबत एक व्हिडीओ एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना 50 ते 60 कोटीची निधी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना 700 ते 800 कोटींचा निधी दिला जातो असा आरोप केला आहे. तर अजित पवार यांनी असा भेदभाव केल्याचे म्हटलं आहे. हे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापल्याचं देखिल त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या आमदारांच्या डबल आणि त्याहीपेक्षा अधिक निधी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला जायचा. मधल्या काळात आम्हाला निधी मिळाला नाही असाही आरोप त्यांनी केला. तसेच निधीशी निगडीत कोणत्या कार्यक्रमालाही शिवसेनेच्या आमदारांना बोलावलं जात नव्हतं असेही ते म्हणाले. तर याचबाबतीत मुख्यमंत्र्यांसोबत बैठका झाल्या मात्र कोणताही फरक झाला नाही. तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या गोष्टींना देखील अजित पवार यांनी केराची टोपली दाखवल्याचा असा गंभीर आरोप शिंदे यांनी केलाय.
निधी वाटपाच्या कारणावरून तर शिनसेनेला राष्ट्रवादीच संपवत असल्याचे आरोप बंडखोर आमदारांनी केले आहेत. त्यातील निधी वाटपात पवार हे दुजाभाव करतात या आरोपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चोख उत्तर दिले. तसेच त्यांनी आपली बाजू मांडताना, आधी हे महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेला सहकार्य करणार असल्याची भूमिका आपली असल्याचे पवार म्हणाले. तर आपल्यावर होत असणाऱ्या निधी वाटपाच्या आरोपावर बोलताना, अडीच वर्षांपूर्वी हे सरकार अस्तित्वात आले. त्यावेळी 36 पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्या. त्यात फक्त राष्ट्रवादीचे नव्हते. तर तिन्ही पक्षांचे सहभागी होते. त्यानुसारच निधी वाटप होत होता. मी कधीही दुजाभाव केला नाही. विकासकामांना सहकार्य करायचे हेच माझे धोरण होते. मात्र जर बंडखोर आमदारांच्या निधी वाटपावरून काही तक्रारी होत्या, तर त्याविषयी त्यांनी एकत्र बसून चर्चा करायला हवी होती. मला सांगायला हवं होतं. येथेच समज गैरसमज दूर केले असते. विकासकामांसाठीचा निधी मी थांबवू शकत नाही, तो त्यांच्या त्यांच्या खात्याला दिल्यावर तो कसा वापरायचा हा त्यांचा प्रश्न आहे. या सरकारमध्ये शिवसेनेचे नुकसान होत आहे आणि दोन्ही काँग्रेस वाढत आहे, असे जर बंडखोर आमदारांचे म्हणणे होते तर त्यांनी तसे त्यांच्या पक्षाच्या बैठकीत सांगायला पाहिजे होते, असेही अजित पवार म्हणाले.