नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार रमेश कुमार शर्मा हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांची संपत्ती 1,107 कोटी रुपये आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली. रमेश कुमार शर्मा बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत.
पाटलीपुत्र येथे भाजपकडून राम कृपाल यादव निवडणूक मैदानात आहेत. शर्मा म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खोट्या आश्वासनांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. शर्मा यांनी चार्टर्ड इंजिनिअरचे शिक्षण घेतलेले आहे. शर्मांकडे 9 गाड्या असून यात फॉक्सवॅगन जेट्टा, होंडा सिटी आणि ओप्टा शेवरले या गाड्यांचा समावेश आहे. शर्मा यांची एकूण संपत्ती 1,107 कोटी रुपये आहे. यात 7 कोटी 8 लाख 33 हजारांची जंगम मालमत्ता आहे.
शर्मा म्हणाले, “नोटबंदी करुन मोदींनी जनतेकडून पैसे काढून घेतले. सगळीकडे गुन्हे होत आहेत आणि ते देशाला लुटत आहेत. मी ही निवडणूक ‘जुमलेबाज’ मोदींविरोधात लढत आहे.” शर्मा यांना आपल्या विजयाबद्दल पूर्ण विश्वास आहे. स्वतः अमित शाह जरी निवडणुकीसाठी आले, तरीही आपण जिंकणार असा दावा शर्मा यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीतील सर्वात श्रीमंत 5 उमेदवारांमध्ये शर्मा एकमेव अपक्ष उमेदवार आहेत. इतर 4 उमेदवार काँग्रेस पक्षाचे आहेत. यात तेलंगणातील चेवेल्लातून काँग्रेस उम्मीदवार असलेले कोंडा विशेश्वर रेड्डी श्रीमंत उमेदवारांच्या यादीत दूसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 895 कोटी रुपये आहे. मध्य प्रदेशमध्ये छिंदवाडातून निवडणूक लढवत असलेले नकुल नाथ तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 660 कोटी रुपये आहे. तामिळनाडूमध्ये कन्याकुमारीतून काँग्रेसचे उमेदवार एच. वसंतकुमार हे चौथ्या क्रमांकावरील श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांची संपत्ती 417 कोटी रुपये आहे. पाचव्या क्रमांकावर मध्य प्रदेशमधील गुना येथून निवडणूक मैदानात असलेले ज्योतिरादित्य सिंधिया आहेत. त्यांची संपत्ती 374 कोटी रुपये एवढी आहे.